…म्हणून राज्य मंत्रीमंडळाची बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेत घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २७ सप्टेंबर २०२१

कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे. पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठकही डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल . राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा,  असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री कु. अदिती तटकरे कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात गड किल्ले, किनारपट्टी, साहसी पर्यटन, धार्मिक स्थळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावा, त्यानंतर इतरत्र जावे, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन विभागाला गरजेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या ८० वरून १० वर आणली, १५ ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होती त्याऐवजी आता केवळ नऊ स्व-प्रमाणपत्र आवश्यक केले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळापाठोपाठ कोकणात जागतिक दर्जाचे हॉटेल व्यावसायिक येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे, ते जपत पुढील काही वर्षात ‘महा’राष्ट्र खऱ्या अर्थाने जगाला दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

पर्यटन राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे शुभेच्छा देताना सध्या विभागामार्फत आखलेल्या योजना आणि धोरणांचा भविष्यात पर्यटन विकासाला निश्चित लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पर्यटन अधिकारी उपलब्ध असावेत, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी विभागाच्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाराष्ट्र ही विविध संधींची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास होत आहे. यासंदर्भात जागृती निर्माण करत पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (UNWTO) ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

संकेतस्थळ व ॲपचे उद्घाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे व महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तब्बल ३५० पर्यटनस्थळांची थीम नुसार वर्गीकृत करून माहिती देण्यात आली आहे.

यावेळी पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विभागाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील नव्या कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सहा विभागातील आकर्षक रंगछटांनी रंगवलेल्या सहा पर्यटन भिंतींचेही अनावरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रत्येक प्रदेशातील पर्यटक आकर्षणे, ऐतिहासिक वारसास्थळे, ख्यात व्यक्ती, कला आणि संस्कृतींचा मेळ घालणाऱ्या सुंदर कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.