नवी मुंबईत मतदार नोंदणी विशेष मोहीम

13,14 आणि 27,28 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीची संधी

  • अविरत वाटचाल न्यूज
  • नवी मुंबई, 12 नोव्हेंबर 2021:

आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये याकरिता दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2021 तसेच दिनांक 27 व 28 नोव्हेंबर 2021 या शनिवार व रविवार अशा शासकीय सुट्यांच्या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गगत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरीक मतदार नोंदणीस पात्र असणार आहेत. या नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदवता यावे यासाठी 13, 14, 27, 28 नोव्हेंबर  या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये मतदार नोंदणी विषयक केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.

येथे मतदार नोंदणीबाबत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असणार असून ते त्याच ठिकाणी स्विकारले जाणार आहेत. उपलब्ध अर्जांमध्ये अर्ज नमुना-6 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, अर्ज नमुना-7 नुसार मतदार यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना-8 नुसार मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना -8अ नुसार मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल.

1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच यापूर्वी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे याबाबत खात्री करून घेणे गरजेचे आहे.

वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई नागरिकांनी या मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा व आपले नाव त्वरीत समाविष्ट करून घ्यावे व असलेले नाव तपासून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

——————————————————————————————————