8 एप्रिलपासून 23 नागरी आरोग्य केंद्रातही होणार कोविड चाचणी

9 ते 5 या वेळेत होणार कोविड चाचणी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 7 एप्रिल 2021:

“मिशन ब्रेक द चेन” च्या प्रभावी अंमलबजावणीव्दारे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने “टेस्ट, आयसोलेशन व ट्रिट” या त्रिसूत्रीवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. या अंतर्गत सध्या कोविड चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या दरदिवशी 8500 ते 9000 इतक्या मोठ्या प्रमाणावर कोविड चाचण्या करण्यात येत असून यामध्ये अधिक वाढ करत नागरिकांना त्यांच्या क्षेत्रात कोविड चाचणी करून घेता यावी याकरिता 23 नागरी आऱोग्य केंद्रांमध्ये कोविड चाचणी केंद्र सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिलेले आहेत. त्यानुसार 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी उद्यापासून 08 एप्रिल पासून सकाळी 9 ते 5 या वेळेत 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.

सध्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही रुग्णालयांमध्ये 24 x 7 कोव्हीड टेस्टींग करण्यात येत असून माता बाल रुग्णालय नेरुळ व माता बाल रुग्णालय तुर्भे याठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेत टेस्टींग कऱण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना प्रसाराच्या दृष्टीने जोखमीचे क्षेत्र असलेल्या ए.पी.एम.सी. मार्केट याठिकाणीही मार्केटच्या वेळांनुसार पहाटे 5 ते सायं. 5 पर्यंत टेस्टींग सुरु आहेत. त्याचप्रमाणे बेलापूर, नेरुळ, वाशी. सानपाडा, तुर्भे, घणसोली, रबाळे अशा 7 रेल्वे स्टेशनवरही सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत कोविड चाचण्या केल्या जात आहेत.

23 कोविड चाचणी केंद्र

सीबीडी बेलापूर, करावे, नेरुळ से. 48, कुकशेत, नेरुळ फेज 1, नेरुळ फेज 2, शिरवणे, इंदिरानगर, सानपाडा, तुर्भे, जुहूगांव, वाशीगांव, पावणे, महापे, खैरणे, घणसोली, कातकरीपाडा राबाडे, राबाडागांव, नोसिल नाका, सेक्टर 2 ऐरोली, चिंचपाडा, दिघा, इलठणपाडा अशी 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कोविड टेस्टींग वाढीवर भर देत असून त्यासोबतच रुग्णसंपर्कातील 30 पर्यंत व्यक्तींचा शोध (Contact Tracing) व प्रतिबंधीत क्षेत्राची (Cotainment Zone) काटेकोर अंमलबजावणी याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय कोरोना पासून बचावाची प्रतिकार शक्ती निर्माण करणा-या कोविड लसीकरणावरही भर देण्यात येत असून 45 वर्षावरील प्रत्येक नागरिकाने महानगरपालिकेचे रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.