मणिपूर, मिझोरमच्या विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा

फास्ट ट्रॅक कोर्टाचा आठ दिवसांतच निकाल

औरंगाबाद/ प्रतिनिधी, 3 जानेवारी 2017:

एका सामाजिक संस्थेत काम करण्यासाठी आलेल्या परराज्यातील तीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या युवकाला कळंब सत्र न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे 24 जानेवारी रोजी घडलेल्या याप्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने जलद सुनावणी घेत अवघ्या आठ दिवसांतच आरोपीला शिक्षा ठोठावली.

तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत बीएसडब्लूचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी हासेगाव (के ) तालुका कळंब  जिल्हा उस्मानाबाद येथील पर्याय संस्थेत फील्ड वर्क करण्यासाठी आल्या होत्या. मूळच्या मिझोराम आणी मणिपूर राज्यातील असलेल्या या तीन विद्यार्थिनी 24 जानेवारी रोजी  तुळजापूरवरून कळंब येथे बसने आल्यानंतर हासेगाव येथील संस्थेत जाण्यासाठी त्या रिक्षामध्ये बसल्या. त्यावेळी खेर्डा येथे राहणारा संतोष प्रकाश लीके (२१) हा तरुणदेखील रिक्षात बसला आणि मुलींसह पर्याय संस्थेच्या कॅम्पसजवळ उतरला. त्यानंतर तो थेट मुलींच्या खोलीत शिरला आणि लपून बसला. त्याने खोलीत आलेल्या एका मुलीला पकडून तिचा विनयभंग केला आणि एका मुलीच्या हाताला चावादेखील घेतला. अचानक झलेल्या प्रकाराने मुली घाबरल्या व त्यांनी आरडा ओरडा केला. मुलींच्या आवाजाने आजुबाजूचे लोक धावत आले. त्यावेळी आरोपी पळून जावू लागला. मात्र लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्याची  माहिती पर्याय संस्थेचे सचिव विश्वनाथ तोडकर यांनी दिली.

याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात संतोषवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभिर्य ओळखून कळंब पोलिसांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयानेदेखील ही विनंती मान्य करीत 25 जानारीपासून खटल्याची सुनावणी सुरू केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी चौकशी करून त्वरीत दोषारोप पत्र कळंब न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी संतोष लिके याला दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धस यांनी दिली.