माथेरान टॉय ट्रेन: ९ दिवसांत तब्बल ३हजार ६९८ प्रवाशांनी घेतला आनंद

विस्टाडोम कोच नेरळ- माथेरान विभागातही प्रचंड लोकप्रिय

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२२

मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळी भेट देणाऱ्या पर्यंटकांसाठी टॉय ट्रेन एक महत्वाचे आकर्षण आहे. पावसाळ्यानंतर २२ ऑक्टोबरला सुरू झालेल्या टॉय ट्रेनमधून पुढच्या नऊ दिवसांतच म्हणजे ३० ऑक्टोबरपर्यंत तब्बल ३ हजार ६९८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे रेल्वेला ४ लाख ८४ हजार १४१ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

नेरळ-माथेरान टॉय ट्रेन जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे.सन २०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- माथेरान ट्रॅक वाहून गेला होता. तेव्हापासून मध्य रेल्वे युद्धपातळीवर रेल्वेची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करीत आहे.  नेरळ ते अमन लॉज पर्यंत पर्वतांना वळण देणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि २२ ऑक्टोबर २०२२ रोजी या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली. टॉय ट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी अत्यंत आनंदात स्वागत केले असून त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे.

२२ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत व्हिस्टाडोममध्ये २२९, प्रथम श्रेणीतील ३७८ आणि द्वितीय श्रेणीतील ३०९१ अशा एकूण ३६९८  व्यक्तींनी प्रवास करून ४ लाख ८४ हजार १४१रुपये इतक्या महसूलाची नोंद केली आहे.  यामध्ये व्हिस्टा डोम तिकिटांच्या विक्रीतून १ लाळ ४९ हजार ९९५ रुपये मिळाले आहेत. जे एकूण रकमेच्या जवळपास ३१ टक्के आहेत.

मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा चालवते. ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.

मध्य रेल्वे माथेरान हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करत आहे.  हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण  होते.