सायन पनवेल महामार्गावरील पथदिवे नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 9 डिसेंबर 2021:

नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणा-या सायन-पनवेल मार्गावरील वाशी टोलनाका ते कोकण भवन या टप्यातील सर्व पथदिवे आणि 4 भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल व दुरुस्तीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. पथदिवे हस्तांतरीत करण्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीकरिता लागणाऱ्या अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक महानगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागास देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागामार्फत याबाबतची पडताळणी करण्यात येऊन  8 कोटी 29 लाख इतकी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेली आहे.

सायन पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महानगरपालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते.  याकरिता सायन – पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विद्युत पथदीप दुरुस्ती व देखभालीसाठी  महानगरपालिकेकडे  हस्तांतरीत  करण्यात यावेत अशी मागणी महानगरपालिकेमार्फत सातत्याने केली जात होती. याबाबत महापालिका व शासन स्तरावर वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी दोन्ही प्राधिकरणाच्या बैठकाही घेण्यात येत होत्या. 15 सप्टेंबर 2021 रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे या पथदिव्यांची दोन्ही प्राधिकरणांमार्फत संयुक्त पाहणी करण्यात आली.

याबाबत अंतिम निर्णय झाला असून वाशी टोलनाका ते कोकण भवन या सायन-पनवेल रस्त्यावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विदयुत यंत्रणा व विदुयत मीटर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विदयुत विभागाकडून हस्तांतरित करण्यात येत असलेले पत्र महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना देण्यात आलेले आहे.

4 पादचारी भुयारी मार्गही हस्तांतरित

त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावरील पादचारी भुयारी मार्ग, नेरुळ येथील दोन पादचारी भुयारी मार्ग व एसबीआय कॉलनी येथील भुयारी मार्ग असे एकूण 4 पादचारी भुयारी मार्ग हे देखभाल व दुरुस्तीकरीता नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.