आरक्षण हटवणार नाही, हटवू देणार नाही

  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह

अविरत वाटचाल न्यूज / मुंबई, 6 एप्रिल 2018:

राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हाला हटवू देणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज स्पष्ट केले. भाजच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त  मुंबईत आयोजित केलेल्या जाहीर मेळाव्यात शाह बोलत होते.

  • भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. हा अत्यंत कठिण प्रवास होता.कार्यकर्ते आणि नेत्यांनी कठोर परिश्रम घेतल्यामुळे आज हा दिवस दिसू शकला असे शाह म्हणाले.

 

  • दहा सदस्यांनी सुरु झालेल्या भाजपाचे आज ११ कोटी सदस्य आहेत. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. गरीबाच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरात सुख पोहोचवण्याचे काम केले. सबका साथ, सबका विकासाचे सूत्र साकार केल, असे शाह यांनी सांगितले.

 

  • राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पवार साहेबांसोबत बसत आहेत. काँग्रेसने देशासाठी काय केले ? राहुल बाबा तुम्ही साडेचार वर्षांचा हिशोब मागता ? देशाची जनता तुमच्याकडे चार पिढयांचा हिशोब मागतेय.  तुम्ही इतकी वर्षा सत्ता असून काय केले ? नरेंद्र मोदींनी उज्वल योजना, मेडिक्लेम अशा योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांपर्यंत लाभ पोहोचण्याचे काम केले, असे शाह म्हणाले.

 

  • रोज सीमेवर हल्ले होत असताना, जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला.देशाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला असे अमित शाह म्हणाले.

सर्व मुद्द्यावर चर्चेला तयार

  • आम्ही संसदेत सर्व मुद्यांवर चर्चा करायला तयार होतो पण विरोधकांनी संसद चालू दिली नाही.  आम्ही उत्तर प्रदेशात पोटनिवडणूक हरलो, पण राहुल गांधी तुमच्या पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले हे लक्षात घ्या. आम्ही दोन जागा गमावल्या पण ११ राज्यात तुम्हाला आम्ही सत्तेवरुन हटवल्याचे शाह म्हणाले.

 

  • मोदी आणि फडणवीस सरकारवर कोणीही एक आरोप करू शकलेलं नाही. शेतकरी आत्महत्येचा आकडा फडणवीस सरकारच्या राज्यात कमी झाला.  खूप मोठा पूर आला की सगळं उद्धवस्त होत तेव्हा सगळे एकाच झाडावर चढतात, तसेच सगळे विरोधक मोदींच्या पुराला घाबरले आहेत. 2019 ची निवडणूक खोट्या अश्वासनावर जिंकायची नाहीय. आपली काम लोकांपर्यंत पोहोचवा.2019 च काऊंटडाऊन सुरू झालायं असे शहा म्हणाले.

सत्तेसाठी सगळे लांडगे एकत्र आलेत-फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे,तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना लक्ष्य केलं.

 

  • ‘आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. ‘पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका.  2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.