एनएसएसच्या विदयार्थी पथक सहभागातून स्वच्छता योध्दा संकल्पना नवी मुंबईत राबविणार

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 12 मार्च 2024

स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना 2023 मधील स्वच्छतेचे देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकन उंचावून निश्चय केला नंबर पहिला हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी लोकसहभागावर अधिक भर दिला जात असून स्वच्छता कार्यात युवकांचा सहभाग वाढीच्या दृष्टीने महाविदयालयातील एनएसएस मधील विदयार्थ्यांना प्रेरीत करण्यात येत आहे असे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी स्वच्छता योध्दा ही संकल्पना मांडली. या संकल्पनेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये स्वच्छता कार्यात उल्लेखनीय सक्रिय सहभाग देणाऱ्या महाविदयालयांच्या एनएसएस पथकांना स्वच्छता योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध महाविदयालयांच्या एनएसएस पथकांच्या सहयोगाने विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न झालेल्या स्वच्छता योध्दा 2024 उपक्रमाप्रसंगी आयुक्त  नार्वेकर यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये स्वच्छता कार्यात सक्रिय सहभागी होणाऱ्या 35 महाविदयालयांच्या एनएसएस पथकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त मंगला माळवे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक नितीन देशमुख, सह जिल्हा समन्वयक  प्रणिता भाले व  सुनिता पाल उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी स्वच्छता कार्यात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या एनएसएस विदयार्थ्यांच्या शिस्तबध्द सहयोगाचा विशेष उल्लेख केला. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियानातही शहराचे मानांकन उंचावण्यासाठी कटिबध्द रहात प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर व समुहाने माझी वसुंधरा अभियानाची डिजीटल शपथ घ्यावी आणि आपल्या नवी मुंबईचा नावलौकिक उंचवावा असे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांसमवेत त्यांनी वसुंधरेची सामुहिक शपथ ग्रहण केली.

नवी मुंबईच्या मानांकनात एनएसएस पथकांचाही महत्वाचा सहभाग असल्याचे सांगत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये एनएसएसचे विदयार्थी अधिक उत्साहाने व जोमाने सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी आरंभ क्रिएशन्सच्या युवा कलावंतांनी सादर केलेल्या माझे शहर माझी जबाबदारी या पथनाटयाला उपस्थितांनी उत्तम दाद दिली. त्याचप्रमाणे ओलू, सुकू व घातकू या तिन्ही कचरा वर्गीकरणाच्या चित्रफितींना तसेच त्यावरील मॅस्कॉटला देखील उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली.

स्वच्छता योध्दा या अभिनव उपक्रमातून सेवाभावी वृत्तीने समाजपयोगी कार्यासाठी कृतीशील असणाऱ्या एनएसएस विदयार्थ्यांचा व्यापक सहभाग स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत घेतला जाणार असून या माध्यमातून शहरात स्वच्छतेची व्यापक चळवळ युवकांच्या साथीने उभारली जात आहे.

========================================================


========================================================