इन्स्टाग्राम, व्हॉटस्अपमुळे अपहृत मुलीचा शोध लागला 

नवी मुंबई पोलिसांची कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 फेब्रुवारी 2022:

मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मुलीच्या कुटुंबियांनी रबाले पोलीस ठाण्यात दिली. मात्र केवळ दोन दिवसांतच सोशल मिडियाच्या आधारे तपास करीत नवी मुंबई पोलिसांनी सदर मुलीला शोधून काढल्याची घटना समोर आली आहे. 

कुटुंबियांच्या तक्रारीनुसार १६ फेब्रुवारी रोजी रबाळे पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार दाखल होताच नवी मुंबई पोलिसांच्या  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी या मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी सगळ्या शक्यता पडताळून घेत मुलीच्या तपासाची दिशा ठरवली. तपासादरम्यान पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही शोध मोहिम सुरू केली. याच दरम्यान इंन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अप या समाजमाध्यमांचा आधार घेत पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरूवात केली असता कथित अपहृत मुलगी आरोपी आकाश पाटील याच्यासह कोल्हापूर इथे असल्याची माहिती मिळाल्याचे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीचा माग काढत गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक कोल्हापूरला रवाना झाले आणि आरोपीसह पिडीत मुलीला ताब्यात घेतले. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे, तृप्ती शेळके, शरद भरगुडे, पोलीस हवालदार शेट्ये, ठाकूर यांचा समावेश होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

=========================================-=============

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप