कामावर उशीरा येणाऱ्या 191 महापालिका कर्मचाऱ्यांची वेतन कपात

3 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 मार्च 2022:

नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. या नवीन वेळेनुसार कर्मचा-यांनी कामावर वेळवर येणे बंधनकारक आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे बंधन पाळत नाहीत व त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी  विविध माध्यमांतून आयुक्तांकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आयुक्त अभिजित बांगर यांनी 27 ऑक्टोबर, 17 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी रोजी उपस्थितीबाबत अचानक आढावा घेतला त्यावेळी बहुतांश कर्मचारी उशीरा येत असल्याचं आढळून आलं. त्यानुसार 191 महापालिका कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्यात आली आहे. यामधील महापालिका आस्थापनेवर असलेल्या 3 कर्मचाऱ्यांची कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

कामकाजाची वेळ

महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर 5 दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यालयीन कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 वा ते सायं. 6.15 वा. अशी आहे. त्यातही शिपाई संवर्गाकरिता ही वेळ सकाळी 9.30 वा. ते  सायं. 6.30 वा. अशी आहे. कार्यालयीन कामकाजाची ही वेळ पाळणे सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे.

मात्र अनेक अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे बंधन पाळत नाहीत व त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी  विविध माध्यमांतून आयुक्तांकडे प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याविषयी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रशासन विभागामार्फत परिपत्रकही काढण्यात आले होते. त्यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळणार नाहीत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते.

याबाबत स्वतः आयुक्तांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व विभागांतील  कार्यालयीन उपस्थितीचा आढावा घेऊन जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसलेबाबत आढळून आले आहे त्यांना विभाग स्तरावर ज्ञापन बजावून त्यांचा खुलासा घेणे आणि सदर खुलासा असमाधानकारक आढळल्यास त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख यांनी अधिनस्त  अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतील याची खबरदारी घ्यावी असेही सूचित करण्यात आले होते. परिपत्रक काढून अवगत केले असतानाही 17 फेब्रुवारी 2022 आणि 24 फेब्रुवारी 2022 रोजी उपस्थितीबाबत अचानक घेण्यात आलेल्या आढाव्यात बहुतांश कर्मचारी पुनःश्च उशीरा येत असल्याचे आढळून आले.

 

 कारवाई

कार्यालयीन कामकाजाचे गांभीर्य न बाळगता कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणेकरिता  या 3 दिवस करण्यात आलेल्या अचानक पाहणीपैकी 1 दिवस उशीरा येणाऱ्या 165 अधिकारी, कर्मचारी यांचे 1 दिवसाचे वेतन/मानधन कपात, 2 दिवस उशीरा येणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांचे 2 दिवसांचे वेतन/मानधन कपात करण्यात आले असून याबाबत त्यांच्या सेवा पुस्तकात लाल शाईने नोंद घेण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे 3 दिवस उशीरा येणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचे 3 दिवसांचे वेतन/मानधन कपात करण्यात आले आहे शिवाय या चारही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे तसेच त्यामधील महापालिका आस्थापनेवर असलेल्या 3 कर्मचाऱ्यांची कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

नागरिकांना दर्जेदार सेवा सुविधा देण्याचे कर्तव्य पार पाडत असताना अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे व वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही याचे गांभीर्य न बाळगणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

—————————————————————————————————–