प्रारूप विकास आराखड्याबाबत 12 हजार हरकती सूचना महापालिकेत जमा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 ऑक्टोबर 2022:

नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत मागील दहा दिवसांत नागरिकांकडून हजारोंच्या संख्यने जमा झालेल्या हरकती सूचना आज नवी मुंबई महापालिकेत जमा करण्यात आल्या. महानगपालिकेचे माजी विरोधी पक्षनेत दशरथ भगत यांनी नवरात्रौत्सवाचं औचित्य साधत आराखड्याबाबत नागरिकांसाठी जनजागृतीचा जागर उभा केला. त्यामध्ये नागरिकांकडून एकूण १२ हजार हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.

महापालिका मुख्यालयात या हरकती आवक जावक कक्षात दाखल करण्यात आल्या. यावेळी जनजागृती अभियान समन्वयक निशांत भगत, शैलेश घाग, सचिन शिंदे, उमेश जुनघरे, मनोज महाराणा आदी उपस्थित होते.

9 ऑगस्ट रोजी शहराचा प्रारूप विकास आराखडा महापालिकेच्यावतीने प्रसिध्द करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेने तब्बल 25 वर्षानंतर प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. मात्र हा विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महापालिकेने नियोजन केले नाही परिणामी विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी समजून घेता आल्या नाहीत. हा आराखडा जाहीर झाल्यानंतर या आराखड्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, आराखडा मराठीत प्रसिध्द करावा यांसारख्या मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नवी मुंबई बचाओ अभियांतर्गत जागर जनजागृतीचा अभियान सुरू केले होते. 5 ऑक्टोबर रोजी वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय उपोषणही केले होते. यावेळी नागरिक, राजकीय प्रतिनिधींनीही भगत यांना पाठिंबा दिला.

जागर जनजागृतीचा अंतर्गत नऊ दिवसांत पामबीच सोनखार, बेलापूर,सीवूडस्, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा या भागांत पोहोचलेल्या या अभियानाला नागरिकांचा भरघोस आणि उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाची जनआंदोलनाची दखल नवी मुंबई मनपाने घेऊन हरकती व सूचनांसाठी मुदतवाढ तत्वतः दिली होती. मात्र अद्याप अंमलबजावणी केली नाही, संकेतस्थळावर मराठी भाषेत अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. परंतु नकाशे आणि टाकलेले आरक्षण याबाबत प्रभाग स्तरीय व्यापक जनजागृती व शिबिरे घ्यावीत या प्रमुख मागण्या मान्य करणे आवश्यक असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.