नवी मुंबईत १० लाखांचा गुटखा जप्त

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ३० ऑक्टोबर २०२२

भिवंडी वरुन नवी मुंबई परिसरात विक्री करण्यासाठी आणलेल्या प्रतिबंधीत गुटख्याचा टेम्पो तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे सहकारी आरोपी गुजरातमधून हा गुटखा आणून मुंबई तसेच नवी मुंबईत विकत असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे अधिक तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सह पोलीस आयुक्त जय जाधव, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये आणि उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अंमली पदार्थविरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासितअली सय्यद यांना २८ ऑक्टोबर रोजी गुप्त खबऱ्याकडून भिवंडी परिसरातून प्रतिबंधित अंमली पदार्थ वाहून नेणारे वाहन तळोजा परिसरात येणार अस्यीच माहिती मिळाली होती. अंमली पदार्थाने भरलेले हे वाहन धानसर टोल नाका येथून पनवेल येथे जाणार होता. या अंमली पदार्थांची नवी मुंबई परिसरात विक्री करण्यात येणार होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासितअली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, एएसआय सलीम इनामदार, पोलीस हवालदार संतोष गायकवाड, कासम पिरजादे, दिपक कांबळे, रमेश उटगीकर,राकेश अहिरे, अर्जून पवार आदींनी पाळत ठेवून धानसर टोल नाका येथे एमएच०४ जेके ८४२९ हा टेम्पो ताब्यात घेतला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये भाजीच्या ट्रेआड मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या या गुटख्याची किंमत १० लाख १५ हजार ७८० इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

========================================