मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला ५० लाखांची लाच घेताना पकडले

अप्पर पोलीस आयुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ५ नोव्हेंबर २०२२

मुंबईः  सरकारी कार्यालयांमध्ये काम करणार्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून एका कंपनीत उभारलेल्या शेडवर कारवाई न करण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेताना मुंबई महानगरपालिकेच्या के पर्व अंधेरी येथे कार्यरत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. सतीश विश्वनाथ पोवार असे या आरोपी कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. या प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरातील एका कंपनीच्या आवारात शेड उभारण्यात आली होती. या शेडवर कारवाई करण्यासाठी २८ आक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या  के पूर्व  येथील अधिकारी, कर्मचारी गेले होते. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता सतीश विश्वनाथ पोवार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा . सतीश विश्वनाथ पोवार यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात येवून भेटण्यास सांगितले. तसेच कारवाई न करण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितली.

लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३१ आक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाच मागतिल्याचे समोर आले.

त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस आयुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सापळा रचून कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून  ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी कार्यकारी अभियंता सतीश विश्वनाथ पोवार याला लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  सतीश विश्वनाथ पोवार या आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.