अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला लाचप्रकरणी अटक

नवी मुंबई, 27 एप्रिल 2017/AV News Bureau:

फळविक्रेत्याच्या हातगाड्यांवर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. अमोल महादेव दहीवले (45) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार हा फळविक्रेता असून त्याच्या 14 हातगाड्या आहेत. या हातगाड्यांवर कारवाई करू नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा कोपरखैरणे इ विभागातील कर्मचारी अमोल महादेव दहीवले याने प्रतिगाडीमागे एक हजार रुपये असे महिन्याला 14 हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम 10 हजार रुपये ठरली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे अमोल दहीवले याची तक्रार केली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर  कोपरखैरणे येथील तीन टाकी परिसरात बुधवारी रात्री सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमोल दहीवले याला रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नवी मुंबईचे पोलीस उपअधिक्षक भागवत सोनवणे यांनी दिली.

ही कारवाई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तायडे, पो.ना. विजय देवरे, पो.ना. संतोष ताम्हाणेकर, पो. ना. संजय कनवाळे यांनी केली.