नवी मुंबईतील स्थानिक ठेकेदारांचा महापालिका अधिकाऱ्यांविरोधात आक्रोश

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचे आ.गणेश नाईक यांचे ठेकेदारांना आश्वासन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 9 डिसेंबर 2022:

नवी मुंबईत बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येवू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांना काम मिळणे कठीण झाले आहे. महापालिकेचे अधिकारी स्थानिक ठेकेदारांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक करीत असल्याचा आरोप नवी मुंबई कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. यापार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना नवी मुंबईत ठेकेदारांची यादी पक्की करा असे आदेशित करायला सांगणार असल्याचे आश्वासन भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आज वाशी येथील कार्यक्रमात दिले.

नवी  मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आज विष्णुदास भावे नाट्यगृहात भूमिपुत्र आणि स्थानिक ठेकेदारांच्या अस्तित्व आणि हक्कांच्या रक्षणार्थ नवी मुंबई बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गणेश नाईक बोलत होते. या कार्यक्रमात नवी मुंबई कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना आपल्या ४६ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठेकेदारांच्या या यादीत शहरातले भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शहरात अनेक वर्षांपासून स्थायिक असणारे नवी मुंबईकर यांचा समावेश असेल असेही आमदार नाईक यावेळी स्पष्ट केले.

नवी मुंबई महापालिकेतील सगळेच अधिकारी चांगले नाहीत. अनेकांनी तर आपली घरे भरली आहेत. त्यामुळे आपण ठरवलं तर या सर्वांचा हिशोब करू शकतो. अधिका-यांनी गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीचा शोध आपण ते सेवानिवृत्त झाल्यावरही घेवू शकतो तशी कायद्यातही तरतूद आहे. त्यामुळे आमच्यावर तशी वेळ आणू देवू नका असा इशारा नाईक यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.

कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून अधिकारी वर्गाने पैसे घेण्याची तरतूद नाही त्यासाठी तुम्ही अधिका-यांचे पगार वाढवा. ज्याप्रमाणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, त्याप्रमाणे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यामधील कर्मचाऱ्यांचे पगार त्या राज्यामध्ये किती उत्पन्न होते त्याप्रमाणे असावं. किती अधिका-यांचे नातेवाईक ठेकेदार म्हणून त्यांची गणना झाली आहे याचा शोध घेतला जाईल. तसा प्रकार असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली जाईल.

शहराबाहेरील ठेकेदार शहरातील विकास कामांचा ठेका घेतात. त्यावेळी इथल्या भौगोलिक परिस्थितीचा, नागरिकांच्या गरजांचा विचार करत नाहीत त्याचा परिणाम शहरातल्या सोयी सुविधांवर होत असतो. शहराबाहेरील ठेकेदारांकडून ठेका घेताना बाजारभावापेक्षाही कमी दर दिला जातो ज्याचा परिणाम कामावर दिसून येतो. विकासाविरूद्द घातकी असा जीवघेण्या स्पर्धेत त्वरित सुधारणा करणे आवश्यक असल्याचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी यावेळी मांडले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिपूत्र ठेकेदारांनाच काम मिळावे, शासन निर्णयानुसार १० लाखांच्या निविदा ऑफलाइन करण्याचा जीआर निघालेला असून सुध्दा तो लागू केला जात नाही, तो लागू केला जावा आणि स्थानिकांनाच सगळी कामे द्यावी, यांसारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष रेनील जेकब, सचिव जितेंद्र रौंदळे, उपाध्यक्ष राजेश साळी, खजिनदार जयवंत पवार, आनंद वैश्य, महेश ठाकूर, तसेच कोअर कमिटी सदस्य माजी नगरसेविका वैजयंती भगत, समाजसेवक अमित मढवी, समाजसेविका निलिमा मढवी, किशोर पाटील, जितेश म्हात्रे, प्रशांत भोईर, मनीष पाटील, गौरव म्हात्रे, वासुदेव पाटील, रमेश पाटील, आर.पी. भगत, जगदीश पाटील, संकेत पाटील, मनेज भगत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप