जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इटीसीत कार्यक्रम

नवी मुंबई, 4 डिसेंबर 2016/ AV News Bureau :

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या इ.टि.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रामार्फत संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग मुल व त्याचे वडील यांनी एकत्रितपणे पाककृती बनविणे, दिव्यांग मुल व त्याचे आजी – आजोबा यांचे एकत्रित गीत गायन, दिव्यांग मुले व त्याची आई यांनी एखादे कौशल्य सादर करणे, दिव्यांग मुले व त्यांच्या भावंडांनी एकत्र नृत्य सादर करणे, अनाथआश्रम/ सेवाभावी संस्थेच्या भेटीव्दारे विद्यार्थ्यांकडून वस्तुरुपात त्याठिकाणी उपयुक्त साहित्य देऊन मुलांना देण्यातील आनंद अनुभवण्याची संधी देणे असे विविध उपक्रम महिनाभर राबविले जाणार आहेत.

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नवी मुंबई महापौर सुधाकर सोनवणे, महापालिका आयुक्त मुंढे, सभागृह नेता जयवंत सुतार, नगरसेविका फशिबाई भगत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांग मुलांना सांभाळणे व त्यांना सक्षम बनविणे हे साक्षात परमेश्वराचे काम असून इ.टी.सी. केंद्रातील शिक्षकवृंद हे काम सुरुवातीपासूनच अत्यंत आपुलकीने करीत आहेत. कोणत्याही शिक्षकाला आपले सर्वसाधारण शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले बघताना आनंद होतो. त्यापेक्षा जास्त आनंद ही विशेष मुले घडविताना व ती पुढे जाऊन स्वत:च्या पायावर सक्षमपणे ऊभी राहताना बघितल्यावर विशेष मुलांच्या शिक्षकांना होत असेल असे मत महापौर सुधाकर सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले.

संस्था व शिक्षकांचा गौरव

याप्रसंगी इ.टी.सी. केंद्रातील श्रवण चाचणी व वाचा कक्षाचा शुभारंभ संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान देणा-या मिरची अँड माईम रेस्टॉरंट, पवई, मसिना हॉस्पिटल भायखळा, सुजाया फाऊंडेशन, अनिमेध चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांना सेवाभावी कार्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे इ.टी.सी. केंद्र व सर्वसामान्य शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या परस्पर सहयोगाने सर्वसामान्य शाळेत तेथील विद्यार्थ्यांसोबत दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेताना दिसतात. याकरीता उत्तम योगदान देणा-या प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई, ए.पी.जे. स्कुल नेरुळ, आयसी.एल. स्कुल वाशी, एन.आय.ओ.एस. वाशी, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 72 आणि 76 या सहा शाळांच्या मुख्याध्यापकांना गौरविण्यात आले.

दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांचा सत्कार

तसेच शारीरिक कमतरतेवर मात करीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, सेरेब्रल पाल्सी असूनही चार्टर्ड अकाऊंटंड झालेले पहिले व्यक्तिमत्व ओमकार निरगुडकर, ग्राफीक डिझायनर श्रुती पुजारी, गुणवंत विद्यार्थी अक्षय प्रधान, इ.टी.सी. केंद्राच्या स्वयंरोजगाराचा लाभ घेऊन झेरॉक्स सेंटर यशस्वीपणे चालविणा-या सुवर्ण गजभिये, फरसाण-मार्ट चालविणारे राधाकृष्ण राजपूत, संगणकीय इंटर्नरशिप करणारे मुर्तुझा नंदुरबारवाला, टेलरिंग व्यवसाय करणा-या शाहिन अन्सारी, अकाऊंटिंग क्षेत्रातील श्रुती किरांगी, हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील प्रतिक केदार, गुणवंत विद्यार्थिनी शारदा विर्णेकर व ओम आवटे या दिव्यांग विद्यार्थी / व्यक्ती यांना गौरविण्यात आले.