पडीक जमिनीवर जंगल फुलवणारा नायक

ऐरोली, बदलापूरमध्ये हजारो झाडांची लागवड करून पर्यावरण जपणारे विभूती भूषण नायक

  • स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 13 जानेवारी 2023

विभूती भूषण नायक हे नाव मार्शल आर्ट आणि नवी मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. 10 गिनिज वल्ड रेकॉर्ड, 20 लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. मार्शल आर्ट मधील तज्ञ आणि पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. मात्र बी.बी. नायक यांची निसर्गप्रेमी आणि हिरवाई फुलवणारे नायक अशी दुसरी ओळखही आहे. मार्शल आर्ट शिकवतानाच त्यांनी ऐरोली, बदलापूर इथल्या पडीक जागांवर जंगल उभारत तिथे हिरवाई फुलवली आहे. आज हजारो झाडे या जागांवर फुलत आहेत. अर्थातच त्यांची ही वाटचाल सोपी नव्हती त्यासाठी मागील सात आठ वर्षांची मेहनत आणि मातीत उतरून केलेले काम मोलाचे आहे. लहरी निसर्गाशी एकरूप झाल्यावर फुललेली हिरवाई त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. शहराला ऑक्सिजन देणा-या या जागा शहरासाठी, इथल्या नागरिकांसाठी अभिमानास्पद आहेत.

 बी.बी. नायक मार्शल आर्टसाठी मुलांना विशेष प्रशिक्षण देत असतात. त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणा-या एका विद्याथर्याने ऐरोली इथल्या एका जागेबदद्ल त्यांना माहिती सांगितली. ही जागा उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांखाली असल्याने तिथे अनेक वर्षांपासून बांधकाम राडारोडा, कचरा याचे डोंगरच तयार झाले होते. या जागेवर झाडे लावूयात अशी त्या मुलाने मागणी केली. आणि इथूनच या जागेवर जंगल फुलवण्याचा प्रवास सुरू झाला.

सात- आठ वर्षांपूर्वी इथे जवळपास 12 फूटांहून अधिक उंचीचे डंपिंगचे डोंगर होते. हे सपाट करणे आणि ते करताना इतरत्र कुठेच डंपिंग न करणे हे मोठं आव्हान असल्याचं नायक सांगतात. या जागेवर काय करता येईल याचा विचार करतानाच इथे मानवनिर्मित जंगल उभे करता येईल का असा विचार त्यांनी सुरू केला. त्यातूनच या जागेवर झाडांची लागवड सुरू झाली. नायक यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने या जागेवरील डंपिंग हटविण्यास सुरूवात केली. मात्र या जागेवर जमा झालेल्या डंपिंगचा 12 फूटाचा डोंगर हलवायचा कसा हा प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी डोंगर, तलाव, रस्ता अशी रचना केली आणि तब्बल सहा महिन्यांनी मैदान तयार झाले त्यासाठी इथल्याच डंपिमधल्या माती, कचरा, माती असे थरच्या थर तयार केले. योगायोगाने तलाव तयार करताना त्याच्या तळाशी नैसर्गिक झराही सापडला त्यामुळे गोड्या पाण्याचा प्रश्न मिटला. या तलावाच्या पाण्याचा वापर झाडांना आणि शेजारीच असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर पाणी मारण्यासाठीही होत असतो.

या डंपिंग ग्राऊंडच्या 6 हजार स्केअर फूट जागेवर 200 झाडांची लागवड करण्यात आली आहे आणि त्यात आणखी उत्तरोत्तर भर पडत आहे. त्यात फळझाडं आणि 50  प्रकारची विविध फुलझाडे आहेत. त्यामुळे इथे आल्यावर शहरात असूनही जंगलात आल्याचा सुखद अनुभवही मिळतो. झाडांच्या सानिध्यामुळे या भागातील वातावरणात वर्षभर गारवा असतो. तसेच झाडांमुळे जैव विविधताही जपली गेली आहे.

 

बदलापूर इथेही नायक यांनी एक संपूर्ण पडिक डोंगर हिरवाईने फुलवला आहे. एका मित्राच्या मालकीची असलेल्या या जागेवर पडिक राहिल्याने अतिक्रमण वाढले होते. त्या मित्राने नायक यांना या जागेवर काय करता येईल का अशी विचारणा केली त्यावर जंगल करूयात असे नायक यांनी सांगितले. अर्थात त्यासाठी आर्थक सहकार्य मिळणार नव्हते मात्र 2 एकरची ही जागा प्रयोगासाठी उपलब्ध होणार होती. नायक यांनी हे आव्हान स्विकारले. जागेवरचे अतिक्रमण दूर केले. दोन एकरचा डोंगर फुलवायचा तर पाणी आवश्यक होतेच. या जागेवर वीज, पाणी काहीच नव्हते. त्यामुळे एमएसईबीच्या मदतीने वीज आणली. पाण्यासाठी दोन बोअरवेल खणल्या. त्यातही वीजेचा भरोसा नाही हे लक्षात घेवून एक बोअरवेल पंपाची आणि एक हातपंपाची करून घेतली. या पंपाचा वापर केवळ इथल्या झाडांना पाणी घालण्यासाठी नव्हे तर एप्रिल – मे महिन्यात जवळच्या आदिवासी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठीही होत असतो.

या प्रकल्पात पपई, नारळ, आंबे, सिताफळ, पेरू, चिकू, डाळिंब, अंजिर यांची हजारो झाडे आणि विशेष म्हणजे वन विभागाची विशेष परवानगी घेवून चंदनाच्या झाडांचीही लागवड करण्यात आली आहे. या झाडांवर वन विभागाचे लक्ष असते. आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पातून परवानगी काढून या झाडांची लागवड करण्यात आली आहे. बदलापूर सारख्या ठिकाणी चंदनाची लागवड हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याचसोबत इथे मोठ्या प्रमाणात पालेभाजीही काढली जाते. मात्र ही भाजी किंवा फळे कुठेही विकली जात नाहीत. इथे काम करणा-या कामगार आणि मित्रपरिवार यांमध्येच ती वाटली जातात.

झाडं, फळे फुलवायची तर केवळ पाणी आणि माती असून चालत नाही त्यासाठी उत्तम खतही वापरावे लागते. या झाडांसाठी रासायनिक खतांचा वापर करायचा नाही यावर नायक ठाम होते. त्यामुळे त्याला पर्याय असलेल्या नैसर्गिक खतांचा वापर सुरू केला. मात्र बाजारात उपलब्ध असणा-या नैसर्गिक खतांमध्येही काही प्रमाणात भेसळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर पर्याय म्हणून मग या ठिकाणी त्यांनी गाय पाळली आहे. तिच्या शेणापासून खत तयार करून त्याचा वापर शेणखत म्हणून केला जात आहे. भविष्यात याच शेणाचा वापर करून बायो गॅस प्रकल्पही सुरू करण्याचा नायक यांचा मानस आहे. संसाधनांची निर्मिती करून तिथेच त्यांचा वापर केला जावा यासाठीच हा सर्व अट्टहास असल्याचे नायक सांगतात. भविष्यात खत निर्मितीसाठी कोंबडी आणि बकरीही पाळण्याचा त्यांचा मानस आहे. या डोंगरावर पावसाळ्यात पडणा-या पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही पर्याय वापरला जाणार आहे.

दीड वर्षांमध्ये या डोंगरावर हिरवाई फुलली आहे. अर्थातच यासाठी नवी मुंबई, बदलापूर हा प्रवास मात्र बी.बी. नायक यांना करावा लागतो. शेतीची, निसर्गाची आवडच तुम्हाला यासाठी प्रेरणा आणि शक्ती देते असे नायक सांगतात. यासाठी त्यांनी संपूर्ण आठवड्याचे नियोजन केले आहे. काही दिवस ऐरोली, तर काही दिवस बदलापूर आणि त्यात मार्शल आर्टचे प्रशिक्षण, पत्रकारिता असा दिनक्रमच आखला आहे.

आपल्या आरोग्यासाठी व्यायामाइतकेच झाडांचेही महत्व आहे, हे लक्षात घेवून सिमेंटच्या जंगलात वृक्षांचा गारवा जपणारे बी.बी.नायक यांची म्हणूनच वृक्ष लागवडीचा नायक म्हणूनही ओळख निर्माण होवू लागली आहे.

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र