कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरात मिरवणुकीचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

  • अविरत वाटचाल न्यूज  नेटवर्क
  • ठाणे, 14 एप्रिल 2023
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे उपस्थित होते.
मिरवणूक
कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा चित्ररथ, लेझीम, तुतारी, दांडपट्टा, बॅण्ड आदी पथके सहभागी झाली. त्यांच्यासह ठाणे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त प्रशांत रोडे आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
 
मुख्यालयात अभिवादन
ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, ठाणे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, प्रशांत रोडे, शंकर पाटोळे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आप्तकालीन दलाचे अविनाश सावंत, यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. 
निळी रोषणाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य शासकीय इमारती तसेच पूल, पादचारी पूल यांच्यावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली. ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, महापालिका मुख्यालय, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, जुना आणि नवीन कळवा खाडी पूल, कोपरी, आनंदनगर येथील पादचारी पूल, वागळे इस्टेट येथील वर्तुळाकार कमान आदींवर ही रोषणाई करण्यात आली. 
========================================================
अविरत वाटचाल  YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र