इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • अलिबाग, 22 जुलै 2023

इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील आहे. या गावातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंत जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. तसेच इरसाळवाडीसाठी एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून अद्यापही शोध न लागलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.

  • बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी समिती
    इरसाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. या गावांतील 43 कुटुंबातील 229 लोकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून अद्यापही 86 नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे. सदर घटनेमध्ये आपले नातेवाईक गमावल्याने स्थानिक नागरिकांवरती मोठा मानसिक आघात झाला आहे, त्यामुळे नातेवाईकांमध्ये भिंतीचे वातावरण काही नागरीक समोर आलेले नाहीत. तरी इरसाळवाडी गावांतील नागरिकांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यांत आली असून जिल्ह्यातील इतर नागरिकांनी व त्यांचे नातेवाईकांनी इरसाळवाडी येथील नागरिकांची काही माहिती असल्यास दूरध्वनीव्दारे संपर्क साधावा अथवा पोलीस स्टेशन चौक, ता. खालापूर प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी यावेळी केले. संपर्कासाठी दिक्षांत देशपांडे तहसिलदार माथेरान मो.नं. 8669056492, शितल राऊत, पोलीस अधिकारी मो.क्र.9850756595, सतिश शेरमकर, सहा.प्रकल्प अधिकारी मो. क्र.9403060273.
    या गावातील नागरिकांचे जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात येत असून त्यासाठी 32 कंटेनर सज्ज करण्यात आले आहेत. याठिकाणी 20 शौचालये, 20 बाथरुम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गृहोपयोगी सर्व साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किटस तयार ठेवण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यात आली असल्याचे डॉ. म्हसे यांनी यावेळी सांगितले.

  • धोकादायक गावांसाठी पालक अधिकाऱ्यांची नेमणूक

रायगड जिल्हा आपत्ती प्रवण जिल्हा असून जिल्ह्यातील एकूण 103 गावे धोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. यामध्ये 9 गावे अतिधोकादायक तर 11 गावे धोकादायक मध्ये आहेत. तर 83 गावे अल्पधोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. यागावांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भेटी देवून तेथील सद्य:स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर धोकादायक असलेल्या 20 गावातील नागरिकांना निवाराशेड मध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित 83 कमी धोका असलेल्या गावांची पाहणी करुन त्यांच्यास्तरावर निर्णय घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना या गावासाठी पालक अधिकारी नेमणूक करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. भविष्यात देखील हवामान खात्याकडून आँरेज आणि रेड अलर्ट देण्यात येतील त्याकाळात अतिधोकादायक गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात यावे,. तसेच त्यांना जीवनावश्यक सर्व सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त या 20 गावांमध्ये सायरन, सिंग्नल, यंत्रणा तयार करण्यात यावी. याबरोबरच गावामध्ये सुरक्षित असे एकत्रित येण्याची ठिकाण निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे डॉ.म्हसे यांनी सांगितले.

  • मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश

रायगड जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्या आठवड्याच्या आत प्राधान्याने भरण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. अलिबाग-वडखळ रस्त्यावरील तसेच महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

  • आर्थिक मदतीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनया दुर्घटनेतील नागरिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व पिण्याचे पाणी आणि सुका खाऊ या साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
    ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.
    ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी कळविले आहे.

========================================================

========================================================