ठाणे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • सातारा, 13 ऑगस्ट 2023

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. व आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली.

ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 जण मृत पावले. त्यात 2 जण शहापूर तालुक्यातील असून त्यात एका 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे—

१. गीता (अनोळखी)
२. झायदा शेख (६० वर्ष)
३. सुनीता इंदुलकर (७० वर्ष)
४. ताराबाई हरी गगे (५६ वर्ष)
५. भानुमती पाढी (८३ वर्ष)
६. सनदी सबिरा मोहम्मद हुसेन (६६ वर्ष)
७.निनाद रमेश लोकूर (५२ वर्ष)
८.भास्कर भिमराव चाबूस्वार (३३ वर्ष)
९.अमरिन अब्दुल कलाम अन्सारी (३३ वर्ष)
१०. अशोक जयस्वाल (५३ वर्ष)
११. भगवान दामू पोतदार (६५ वर्ष)
१२. अब्दुल रहीम खान (५८ वर्ष)
१३. सुनील तुकाराम पाटील (५५ वर्ष )
१४. ललिताबाई शंकर चव्हाण (४२ वर्ष)
१५. चेतक सुनील गोडे (४ वर्ष)
१६. अशोक बाळकृष्ण निचाल (८१ वर्ष)
१७. नूरजहाँ खान (६० वर्ष)
१८. कल्पना जयराम हुमाने (६५ वर्ष)

  • ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची प्रसारमाध्यमांना माहिती

ठाणे महानगरपालिकेचे आयुकत अभिजित बांगर यांनी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 18 मृत्यू पैकी पुरुष 8 व महिला 10 आहेत. दोन महिन्यापूर्वी 40 परिचारिकांची भरती करण्यात आलेली आहे. परिचारिकांची रुग्णाची काळजी घेण्यासाठी खूप गरज असते. कोविड काळातील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूर्वी पोस्टमार्टम फक्त दिवसा करण्यात येत होते, आता पोस्टमार्टम रात्रीसुध्दा करण्यात येणार आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे.

  • पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आयुक्तांना सूचना

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी तातडीने जाऊन नेमके काय झाले आहे, याची माहिती घेण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी  शिनगारे व ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या. या प्रकरणी आयुक्त, आरोग्य सेवा , जिल्हाधिकारी ठाणे, आयुक्त महानगरपालिका ठाणे, जे जे रुग्णालयाचे तज्ञ यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

  • दोषींवर कठोर कारवाई- केसरकर

ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे 18 लोकांच्या मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी कमिटी नियुक्ती करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज जाहीर केले.

========================================================