नवी मुंबई महानगरपालिकेचा 32 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

  • अविरत  वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 जानेवारी 2024

 

ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेत रुपांतरित झालेली नवी मुंबई ही देशातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था असून स्थापनेपासूनच प्रत्येक बाबीत आपले वेगळेपण जपले आहे. आज स्वच्छता व सुशोभिकरणात नवी मुंबई देशात आघाडीवर असून आजवरच्या नावलौकीकात महापालिका प्रशासनाप्रमाणेच येथील सक्रीय लोकप्रतिनिधी, जागरुक नागरिक यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृह येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी आ. मंदा म्हात्रे, आ.गणेश नाईक, अति. आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवाळ उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मागील वर्षभरात नवी मुंबई महानगरपालिकेस राष्ट्रीय व राज्य पातळीवर लाभलेल्या पुरस्कार व सन्मानांचा उल्लेख करीत त्यांनी सुरु असलेले प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण केल्याचा निर्धार व्यक्त केला. यापुढील काळात स्वच्छ, सुंदर व पर्यावरणशील शहराचा बहुमान उंचावण्यासाठी महानगरपालिका सर्वांच्या एकत्रित सहयोगाने कटीबध्द असल्याचे सांगून याकामी सर्वांचाच सक्रीय पाठींबा मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

यावेळी डिसेंबर 2023 मध्ये सेवानिवृत्त होणारे उप मुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, मुख्याध्यापक तन्वी सुर्वे व कृती पाटील, प्राथमिक शिक्षिका अनिता परुळेकर व अविनाश पाटील, शिपाई चंद्रशेखर कोळी, सफाई कामगार आशाबाई जाधव, कक्षसेविका मनिषा गोडे या नमुंमपा कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती निमित्त तसेच शस्त्रक्रियागृह सहायक अंकुश राठोड यांचा स्वेच्छानिवृत्ती निमित्त मान्यवरांच्या  शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त अधिकारी, कर्मचारीवृंदाने सादर केलेल्या गीत, नृत्य कलाविष्कारांना उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालय इमारतीस आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी नववर्षारंभादिनानिमित्त मुख्यालयाठिकाणी मध्यरात्री बारा वाजता नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहत नववर्षाचे केले. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व नवी मुंबईकर नागरिकांना महापालिका वर्धापनदिनाच्या तसेच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

========================================================

========================================================