किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)

  • सिध्दार्थ हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 26 मार्च 2024

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नैना प्रकल्प, तिसरी मुंबई अशा असंख्य महत्वकांक्षी प्रकल्पांमुळे जगाच्या नकाशावर भारताचे आणखी एक नवे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येणाऱ्या नवी मुंबई परिसराची सागरी सुरक्षा अतिशय संवेदनशील बनली आहे. कोणत्याही प्रकारची घुसखोरी वा दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सागर सुरक्षा एप च्या माध्यमातून आधुनिक सुरक्षा कवच उभारले आहे.

नवी मुंबईची व्याप्ती वाढत आहे. शिवाय नवी मुंबई परिसरात येणारे विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प लक्षात घेता सागरी सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आधुनिक स्पीड बोटी तसेच अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त- नवी मुंबई

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत नवी मुंबई, उरण हा परिसर येतो. सागरी किनारपट्टी लाभलेल्या या शहरांमध्ये ३८ लॅंडीग पाइंट निश्चित करण्यात आलेले आहेत. साधारणतः१०४ कि.मी. लांबीपेक्षा अधिक किनारपट्टी लाभलेल्या या भागाच्या सुरक्षेसाठी उरण, न्हावा शेवा, वाशी, मोरा, एनआरआय ही सागरी पोलीस ठाणीही निर्माण करण्यात आली आहेत. असे असले तरी खोल समुद्रातून घुसखोरी वा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी सागरी पोलिसांसह नेव्ही, कोस्ट गार्ड, मेरीटाइम बोर्ड, कस्टम्स, मच्छिमार आदींच्या सहकार्याने सातत्याने गस्त घातली जाते. तसेच हा बंदोबस्त चोख व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सागर रक्षक अपच्या माध्यमातून सातत्याने २४ तास सुरक्षेचा आढावा घेतला जातो.

सागर रक्षक अप चे कार्य

सागरी सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या शहरातील सर्वच लॅडींग पाइंटवर लक्ष ठेवण्यासाठी क्युआर कोड स्कॅनर सिस्टीम बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या तसेच गस्त घालणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्त केलेल्या लॅंडीग पाइंटवर असलेल्या क्युआर कोडच्या ठिकाणी येऊन एपच्या माध्यमातून स्कॅन करून तसेच सेल्फी काढून आपली उपस्थिती दाखवली जाते. जर एखादा पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित नसेल तर क्युआर कोड स्कॅन होत नाही. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने नेमून दिलेल्या जागी पोलीस कर्मचारी आहे किंवा नाही,याबाबत पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवता येते. ही क्युआर कोड स्कॅन पद्धती दिवसातून अनेक वेळा केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी दिली.

किनारपट्टी भागातून होऊ शकणाऱ्या संभाव्य घुसखोरी वा आक्रमणाला रोखण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.सर्व उपकरणांनी युक्त अशा अत्याधुनिक स्पीड बोटींसह सागर रक्षक अपच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवले जात आहे. तसेच अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचा प्रयत्न सुरु असून सागरी सुरक्षा अधिक भक्कम होत आहे.

प्रशांत मोहीते- उपायुक्त विशेष शाखा

सागरी गस्तीसाठी नवी मुंबई पोलिसांचे ११० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. याव्यतिरिक्त १४ पोलीस अधिकारी अधिकारी आणि २१ ते २५ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने खोल समुद्रात इंटर सेप्टर स्पीड बोटींच्या मदतीने नियमित गस्त केली जाते. सध्या तीन पोलीस दलातील आधुनिक बोटी आणि खबरदारीचा उपाय म्हणून आणखी ३ स्पीड बोटी भाडे तत्वावर घेवून गस्तीचे काम सुरु असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले जात असल्याचेही पवळे यांनी सांगितले.

गस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबतीला समुद्रात संवेदनशील असणाऱ्या सर्व लॅंडीग पाइंटवर नाइट व्हिजन कॅमेरेदेखील लावण्यात आल्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक समक्ष झाल्याची माहिती पवळे यांनी दिली.

========================================================


========================================================