राज ठाकरे समांतर सरकार चालवतात का ?

संजय निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

चित्रपट प्रदर्शनावरून राज ठाकरे व शाहरूख खान यांच्या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया

मुंबई, 13 डिसेंबर 2016 /AV News :

रईस चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या परवानगीसाठी शाहरुख  खान याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याप्रकरणी कॉंग्रेसने राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. चित्रपट निर्माते आणि कलाकारांना सेन्सॉर बोर्डाऐवजी राज ठाकरे यांचे दरवाजे ठोकावे लागत आहेत. म्हणजे एकप्रकारे राज ठाकरे हे समांतर सरकार चालवत आहेत का, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असा टोला मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला आहे.

रईस चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मनसेने भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलावंताना घेण्यास विरोध केला आहे. मध्यंतरी करण जोहर यांच्या चित्रपटाला मनसेने विरोध केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आपल्याही चित्रपटाला मनसेचा विरोध होवू नये म्हणून शाहरूख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या चित्रपट प्रदर्शनाला अभय देण्याचे काम सरकारचे आहे. माय नेम ईज खानच्या वेळी शिवसेनेने विरोध केला होता त्यावेळी कॉंग्रेस सरकारने हा चित्रपट प्रदर्शित करु दिला. कायदा व सुव्यवस्थाची जबाबदारी ही सरकारची आहे. देशभक्तीच्या नावाखाली काही लोकांची हप्ते खोरी सुरू आहे. या गोष्टीला भाजपा सरकारचे सुद्धा अभय असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.

राज ठाकरे यांना कोणी भेटायला गेले हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र हप्ते वसुली करणाऱ्यांना आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती निरुपम यांनी दिली.