रस्त्यांवर पार्क होणाऱ्या वाहनांवर कायद्याचा बडगा

नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलीस संयुक्तपणे कारवाई करणार 

नवी मुंबई, 26 डिसेंबर 2016/AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिकेनं नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाच्या वतीनं महापालिका क्षेत्रात वन साईड पार्कींग, वन वे – टू वे वाहतुक, नो पार्कींग झोन अशा विविध प्रकारे पार्कींगचं नियोजन केलं आहे व त्यानुसार ठिकठिकाणी नो पार्कींगचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. तरी जे नागरिक रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे गाडी पार्क करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूनं वाहनं पार्क केलेली आढळून येतात. त्यामुळं रहदारीला अडथळा होत असल्याच्या तसेच वाहतुकीला त्रास होऊन वाहतुक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला वाहने उभी रहात असल्यानं दैनंदिन स्वच्छता करतानाही या वाहनांचा अडसर होत आहे.  अत्यंत तातडीच्या प्रसंगी रूग्णवाहिका,  अग्निशमन वाहने यांनाही या पार्कींग केलेल्या वाहनांमुळं मोठ्या प्रमाणावर अडचण होऊन मदतकार्य करण्यात अडथळा होताना दिसतो. यापैकी अनेक वाहनंं तर खूप दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली आढळून येतात. या सर्व गोष्टींचा दैनंदिन नागरी जीवनावर परिणाम होतोच शिवाय आपत्ती प्रसंगातही मोठा अडसर होतो.

 

  • बेवारस उभी असणारी वाहने उचलून नेणार

अनेक रस्त्यांवर बेवारस वाहनं पडून आहेत अथवा कितीतरी वाहनं अनेक महिने, वर्षे उभ्या असलेल्या ठिकाणाहून हलविलेली दिसत नाहीत. अशा अनेक वाहनांच्या मालकांना महानगरपालिकेनं नोटिसाही बजावल्या आहेत. यापुढील काळात अशाप्रकारची एकाच जागी बराच काळ उभी असणारी वाहनं महानगरपालिकेमार्फत उचलण्यात येऊन क्षेपणभूमीवर नेण्यात येतील त्याचप्रमाणे बेवारस वाहनांबाबत आरटीओ कडून त्यांच्या क्रमांकावरून त्यांचे मालक शोधून त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं सूचित करण्यात येत आहे.

  • स्कूल बसेसवरही कारवाई होणार

याशिवाय ब-याच रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कुल बसेस पार्कींग होत असल्यानं वाहतुक कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होताना दिसतो. अशाप्रकारची वाहनं योग्य पार्कींग जागेतच पार्क करण्यात यावीत,  अन्यथा कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.

  • पदपथांवरील गॅरेजेसवरही पालिका कारवाई करणार

अनेक ठिकाणी अनधिकृत गॅरेजेसचे काम रस्त्यांवरच चाललेले निदर्शनास येते. त्यामुळे वाहतुक कोंडी होतेच, शिवाय त्याठिकाणी पंक्चरचं पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जात असल्यानं मोठ्या प्रमाणावर अस्वच्छताही पसरते. अशा ठिकाणी रस्त्यांवर दुरूस्तीचं काम चालत असल्यानं रहदारीला व वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होत असतो. अशा गॅरेजेस चालकांनी वाहन दुरूस्तीसाठी करण्यात येणारा रस्त्याचा वापर त्वरीत थांबवावा अन्यथा त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपाची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येईल, कायदेशीर कारवाई करण्यात येईल व मोटार व्हेईकल कायद्यानुसार गरज भासल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.

  • नागरी सोसायट्यांमधील पदपथावर असणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार

न्यायालयाने पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असल्यानं त्यावर त्यांचा हक्क प्राधान्यानं असल्याचे आदेशित केले आहे.  ब-याच सोसायट्यांमधील वाहने, विशेषत्वाने दुचाकी वाहने पदपथावर उभी केली जात असल्याने नागरिकांना पदपथ चालण्यासाठी उपलब्ध होत नाहीत, याचीही दखल नागरिकांनी घ्यावयाची आहे.

त्याचप्रमाणे अनेक इमारतींमध्ये पार्कींगसाठी असलेल्या स्टिल्ट जागा बांधकाम करून अनधिकृतपणे वाणिज्य/निवासी वापरात आणल्याचेही आढळून येत  आहे.  त्या इमारतींमधील सदनिका/गाळा धारकांची वाहने मात्र रस्त्यांवर उभी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बाहेर रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळं वाहतुक कोंडी होऊन रहदारीला त्रास होत आहे. अशा इमारतींवरही अनधिकृत स्टिल्ट पार्कींग जागा खुल्या करण्याची कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी त्यापुर्वीच आपल्या अनधिकृतरित्या बंद केलेल्या स्टिल्ट पार्कींगच्या जागा पार्कींगसाठी खुल्या कराव्यात असे आवाहन आहे.