सोनाक्षीचे ‘उर्दू’ प्रेम

मुंबई,25 मार्च 2017/AV News Bureau:

आपल्या दबंग अदाकारीने बॉलिबूडमध्ये वेगळा ठसा उमटवणारी सोनाक्षी सिन्हा उर्दू भाषेबद्दल कमालीची संवेदनशील आहे. उर्दू भाषा ही आदर आणि प्रेमाचं प्रतिकच  आहे. त्यामुळे ही भाषा बोलताना शब्द कसे आणि कुठे वापरावेत याबाबत ती कमालीची दक्ष असते.

दैनंदिन व्यवहारात बोलताना सोनाक्षी जास्तीत जास्त उर्दू शब्दांचा वापर करण्यावर भर देते. त्यामुळे जेव्हा कधी एखादं गाणं ऐकताना किंवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना एखादा उर्दू शब्द नजरेला पडला अथवा कानावर आला की लगेचच तो शब्द ती टिपून घेते. ते शब्द रोजच्या व्यवहारातही वापरते.

सोनाक्षीच्या दोन चित्रपटांमध्ये तिचे नाव उर्दू भाषेतूनच घेतलेले आहेत. ‘लुटेरा’ या चित्रपटात तिचे नाव ‘पाखी’ होते तर आता ‘नूर’ चित्रपटात ‘नूर’ असे नाव आहे.  पाखी या शब्दाचा उर्दूत अर्थ चाकू असा तर नूर या शब्दाचा अर्थ प्रकाश असा आहे. त्यामुळे या शब्दाचा उच्चार सोनाक्षीला कमालीचा भावतो. त्यामुळे आता अधिकाधिक उर्दू शब्द रोजच्या वापरात आणून आपली भाषा अधिक समृद्ध कशी होईल, याकडे सोनाक्षीचा कटाक्ष असतो.

आज चित्रपट क्षेत्रात अनेक मंडळी आपले नशीब आजमवताना दिसतात. मात्र भाषेच्या नावाने बोंब असते. त्यामुळे सोनाक्षी उर्दू भाषा आत्मसात करण्यासाठी जी मेहनत घेत आहे, ती खरंच कौतूकास्पद आहे.