कृती अध्ययन पध्दती राबविणारी ठाणे महापालिका पहिली

 ठाणे, 11 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यामध्ये जीवन कौशल्ये, जीवनमूल्ये रुजावीत यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या 78 शाळांमध्ये कृतीयुक्त अध्ययन पध्दती राबविण्यात येणार आहे. कृतीयुक्त अध्ययन पध्दती राबविणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे कृतीयुक्त अध्ययन पध्दतीचे (ABL)  शिक्षकांसाठी प्रशिक्षण शाळा क्र. 23 किसननगर येथे गुरुवारी आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थ्याना भाषा व गणित हे विषय अधिक सहजतेने स्पष्ट होण्यासाठी ही कृती अध्ययन पध्दती प्रभावी ठरणार आहे.

ज्ञान रचनावाद हा या अध्ययन पध्दतीचा गाभा असून, कृतीयुक्त अध्ययन पध्दतीचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना साहित्याचा अभ्यास हा सुलभ होणार आहे. तसेच हे प्रशिक्षणशिक्षकांना दिले गेल्यामुळे वर्गात ही विद्यार्थ्यांना समजावून सांगताना शिक्षकांचा उत्साह वाढणार असून विद्यार्थ्यांचाही सर्वागीण विकास होईल असे मत शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी यावेळी व्यक्त केले.

कृती अध्ययन पध्दतीचे राज्य प्रशिक्षण तज्ञ सिध्दार्थ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव राऊत, मनोज पुरंदरे, बाळकृष्ण्‍ सोनईकर यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने महापालिकाशाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन दिले. गटाधिकारी संगीता बामणे व अस्ल्म कुंगले, गटप्रमुख, मुख्याध्यापक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तर  प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता वृषाली सावंतव संजय पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.