मतदानासाठी 21 फेब्रुवारीला सुट्टी

10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांची निवडणूक

मुंबई, 18 फेब्रुवारी 2017/ AV News Bureau :

येत्या 21 फेब्रुवारी रोजी राज्यातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी  मतदान होणार आहे. यादिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदान क्षेत्रातील  विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना भरपगारी सुट्टी द्यावी असे आदेश कामगार आयुक्तांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम,/अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. वरील सूचनांचे पालन मालक/आस्थापना यांनी न  केल्यास संबंधितांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल. एखाद्या आस्थापनाने  कर्मचाऱ्यांस मतदानाकरिता सवलत न दिल्यास  त्याबाबतची तक्रार संबंधितानी  21 फेब्रुवारी 2017 रोजी कार्यालयीन वेळेत  संबंधित ‍जिल्हा कामगार कार्यालय तसेच मुंबई क्षेत्रातील तक्रारी संदर्भात कामगार आयुक्त यांच्या मुंबईतील कार्यालयात (दूरध्वनी क्रमांक 26572937/26573733/26572922/26573844) किंवा प्रमुख निरीक्षक दुकाने व आस्थापना, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्रमांक-23616961/23635390) या ठिकाणी संपर्क साधावा असे  कामगार आयुक्त, मुंबई यांनी केले आहे.