IPL 10-धोनीला कर्णधारपदावरून हटवले

मुंबई, 19 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सने कर्णधारपदावरून बाजूला सारले आहे. धोनीच्या जागी आता ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज संघावर बंदी घातल्यानंतर रायजिंग पुणे सुपरजायंट्स हा नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाला आहे. या संघाचे कर्णधारपद धोनीकडे देण्यात आले होते. मात्र धोनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली 14 सामन्यांपैकी फक्त 5 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता.  त्यामुळे गेल्या मोसमात पुण्याचा संघ आयपीएलच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर फेकला गेला होता. त्यामुळे यावेळी नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या 10 व्या मोसमात उतरून चांगली कामगिरी करण्याचा निर्धार रायजिंग पुणे सुपरजायंट्सने व्यक्त केला आहे. यामुळेच धोनीला बाजूला सारत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आल्याची माहिती रायजिंग पुणे आयपीएल संघव्यस्थापनाने प्रसारमाध्यमांना दिली.

भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीची ओळख आहे. कॅप्टन कूल धोनीने जगज्जेतेपद मिळवत भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आता काळाच्या ओघात मोदीने तिन्ही प्रकारच्या कर्णधारपदावरून पायउतार होत केवळ एक खेळाडू म्हणून भारतीय संघात राहण्याचा निर्णय घेतला आहे.