कांदा रडवणार

नवी मुंबई, 11 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

सध्या राज्यभर पडत असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला आहे. साठवणीतला कांदा संपत असून नवीन कांद्याची आवक  बाजारात मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या काही दिवसापासून हजेरी लावणाऱ्या परतीच्या पावसाने कांद्याची गणिते बदलली असून आवक घटल्यामुळे ऐन दिवाळीत आणि त्यापुढील काळात कांद्याचे भाव काहीसे चढे राहण्याची शक्यता कांदा व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. onion price 

गेल्या वर्षी कांद्याचे मुबलक उत्पादन झाले होते. मात्र ज्या प्रमाणात उत्पादन झाले होते, त्याप्रमाणात कांद्याला मागणी न मिळाल्यामुळे दर घसरले होते. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसला होता. गेल्या वर्षभरात शेतक-याला कांद्याने लांगलेच रडवले होते. म्हणून यंदाच्या मोसमात शेतक-यांनी कांद्याचे उत्पादन कमी घेतले. त्यामुळे यंदाच्या मोसमात कांद्याचे भाव काहीसे चढे राहणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्यातच आता साठवणीतला कांदा संपून नव्या कांद्याची आवक अपेक्षित असताना परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आवक कमी होवून होऊन दर वाढण्याची शक्यता कांदा-बटाटा आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केली.

  • सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात एक किलोचा दर 24 ते 27 रूपये इतका असला तरी किरकोळ बाजारात हेच दर 32 रुपयांपर्यंत चढे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत कांद्याची आवक कमी झाल्यास दर कडाडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.