फुंडकर, बापट यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पंतप्रधानांना पत्र

शिवसेनेचे ज्येष्ठ  नेते रामदास कदमांकडून नाराजी व्यक्त

मुंबई, 5 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर येथे गेलेल्या राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या विदेश दौ-यांवर  विरोधी पक्षांसह शिवसेनेच्या मंत्र्यांनीही टीकेची झोड उडवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना  पत्र  लिहून या नेत्यांची तक्रार केली आहे.

राज्य सरकारमधील मंत्री असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या दौ-याचे समर्थन केले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र  मोदी यांना  पत्र  लिहून या नेत्यांची तक्रार केली आहे. तुम्ही शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन वाढवा असे आवाहन केले होते  त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी पीक घेतले आहे. मात्र किमान हमी भावात तुरीची खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले . मराठवाडा व विदर्भातील शेतकरी  सरकारने तूर हमी भावात घ्यावी या प्रतिक्षेत  आहेत. शेतकरी अडचणीत असताना तूर खरेदीशी थेट संबंध असणारे  दोन मंत्री  परदेश दौ-यावर   जातात हे योग्य नाही. शेतकऱ्यांची समस्या उग्र बनलेली असताना हे मंत्री   तेरा दिवसांच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला  कसे जातात  असा सवाल चव्हाण  यांनी पत्रात केला आहे. या मंत्र्यांना माघारी बोलावून शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय करायला लावा असेही   पृथ्विराज चव्हाणांनी या पत्रात लिहिले आहे.

शेतक-यांना आज आधाराची गरज आहे ही वेळ परदेश दौ-याची नाही. शेतकरी संकटात असताना मंत्र्यांनी दौ-यावर जाणे म्हणजे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे.  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकार एक  काळात  मंत्र्यांचे दौरे रद्द केले होते. कर्जमाफी मागणारे विरोधी पक्षाचे आमदारही परदेश दौ-यात सहभागी झाले आहेत याबाबत  रामदास कदम यांनी  आश्चर्य  व्यक्त केले. मात्र शिवसेनेचेही आमदार दौऱ्यात  आहेत याविषयी मात्र  त्यांनी मौन पाळले.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र य़ा दौऱ्याचे समर्थन केले आहे.  मुनगंटीवार म्हणाले  हे दौरे यापूर्वीच, उभय राष्ट्रांशी चर्चा होऊन ठरलेले असतात. मंत्री परदेश दौ-यावर असले तरी  मुख्यमंत्री येथेच आहेत. राज्यातील  शेतकऱ्यांबाबतीत आवश्यक ते सर्व उपाय योजले जात आहेत असेही  मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.  .