भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा

मुंबई, 4 मार्च 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिकेत सत्ता कोण स्थापन करणार याबाबत एकीकडे तर्कवितर्क लढविले जात असतानाच महापौरपदाची निवडणूकच आम्ही लढणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महापौरपदासह कोणत्याही समितीच्या निवडणूका लडणार नसल्याचे जाहीर करीत महापौरपदाच्या निवडणुकीच्या वादावर पडदा टाकला.

मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर चालली आहे. मात्र पुरेशा संख्याबळाअभावी दोन्ही पक्षांना एकहाती सत्ता मिळवणे कठीण झाले आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी करण्यास तयार नसल्याचे सध्यातरी दिसून येते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदीसह अपक्षांनीही शिवसेनेबाबत काहीशी अनुकूलता दाखविली आहे. त्यामुळे भाजप कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत महापौरपदासह उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीचीही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेसोबत युती करण्यास आपण आजही तयार असल्याचेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेत आपण विरोधी पक्षात राहणार नाही. परंतु मुंबईच्या विकासासाठी शिवसेनेला संपूर्ण समर्थन करू, असे स्पष्ट करीत मुंबईच्या कारभार पारदर्शकपणे चालविण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. त्यासाठी आयुक्तांसह स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती केली जाणार असल्याचेही मुख्यमत्र्यांनी सांगितले.

  • शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आघाडीवर असणाऱ्या शिवसेनेने महापौर आपलाच होईल, असे स्पष्ट करीत आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांनी आज अर्ज दाखल केले. कॉंग्रेस पक्षातर्फे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी महापौरपदासाठी तर विन्नी डिसोझा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले.