मुंबई तुंबण्याला सेना-भाजप,आयुक्त जबाबदार

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम (sanjay nirupam on mumbai rain)

मुंबई, 29 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

आज दिवसभराच्या पावसामुळे पूर्ण मुंबई ठप्प झालेली आहे. रेल्वे सेवा बंद पडलेली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. हिंदमाता परिसरात  ४ ते ५ फूट पाणी साचलेले आहे. केइएम हॉस्पिटलमध्ये पाणी भरलेले आहे. अंधेरी सबवे आणि वरळी सी लिंक मार्ग बंद करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजप सरकार व महापालिका आयुक्त अजोय मेहता जबाबदार आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिका चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगरपालिकेची सत्ता सोडून द्यावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने ६ पंपिंग स्टेशन्स बसवलेले आहेत. ज्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. ते नादुरुस्त झाले आहेत. महापालिकेतील शिवसेना-भाजप सरकारने ते पैसेसुद्धा खाल्ले. १२ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार असताना केंद्र सरकारकडून वादळी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी  BRIMSTOWAD प्रोजेक्ट अंतर्गत महापालिकेला १६०० कोटी रुपये देण्यात आले होते. याचे फक्त ४०% काम पूर्ण झालेले आहे. महापालिकेद्वारे दरवर्षी सुमारे २ हजार कोटी रुपये ड्रेनेज सिस्टिमसाठी खर्च केले जातात. ४०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले जातात. तरीही मुंबई तुंबलेलीच आहे. पश्चिम उपनगरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे खोदकाम करण्यात आले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरामधील लोकांचेही फार हाल झाले असून मुंबई महापालिकेचा आपत्कालीन  व्यवस्थापन विभाग परिस्थिती आवाक्यात आणण्यात अपयशी ठरल्याचे निरुपम म्हणाले.

  • महापालिका आयुक्त अजोय मेहता अपयशी ठरले –निरुपम (sanjay nirupam on mumbai rain)

पावसाळ्यापूर्वी महापालिका आयुक्त म्हणाले होते की, पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा त्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरलेला आहे. मनपा आयुक्त सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर महापालिका आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांनी राजिनामा घ्यावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे निरुपम म्हणाले.