भावे नाट्यगृहातील सुधारणा कामे लवकरच

महापालिका प्रशासनाचे मनसेला लेखी उत्तर

नवी मुंबई, 16 मार्च 2017/AV News Bureau:

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या सुधारणांची कामे करण्यासाठी सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे पत्र नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नवी मुंबई मनसेला देण्यात आल्याची माहिती शहर संघटक श्रीकांत माने यांनी दिली. भावे नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी विकास आराखडा जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र नवी मुंबई मनसेच्यावतीने 1 फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाला दिले होते.

नवी मुंबईतील नाट्यप्रेमींसाठी असलेल्या एकमेव अशा वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयी-सुविधांचा मुद्दा नवी मुंबई मनसेने सातत्याने लावून धरला होता. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांना घेऊन मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नाट्यगृहाचा पाहणी दौरा ही केला होता. मात्र नंतर तात्पुरती डागडुजी पलीकडे काहीही झाले नसल्याकारणाने विष्णुदास भावे नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर करण्याची मागणी मनसे चित्रपट सेनेने आयुक्त तुकाराम मुंढे व शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याकडे केली होती.

प्रस्तावित अंदाजपत्रकामध्ये नाट्यगृहात नवीन खुर्च्या बसविणे, आधुनिक पद्धतीची लाईट व्यवस्था करणे, नवीन आधुनिक साऊंड सिस्टीम बसविणे, प्रोजेक्टर बसविणे, फूड प्लाझा/ कॅफेटेरिया तयार करणे, इंटिरियरची काम करणे व प्रदर्शन गॅलरीची सुधारणा करणे इत्यादी कामे करण्याचे प्रस्तावित असल्याचे महानगरपालिकेने पत्रात म्हटले  आहे.

A.C. प्लांट अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्याचा कधीही स्फोट होईल अशी भीती आहे. त्याचबरोबर G+2 च्या या नाट्यगृहाच्या इमारतीत लिफ्ट बसवणार की नाही याचा उल्लेखच पत्रात केलेला नाही. तसेच २०१५-१६/ २०१६-१७ या वर्षांत नाट्यगृहाच्या सुधारणांवर किती खर्च झाला याचा तपशील मनपाने अजून जाहीर केला नाही. त्यामुळे जोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत मनसे स्वस्थ बसणार नाही, असे नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेचे चिटणीस शैलेश भुतडा यांनी सांगितले.