शेतकऱ्यांची संमती असेल तरच जमिनी घेणार

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विधानसभेत माहिती

मुंबई,- 24 मार्च 2017/AV News Bureau:

रायगडमधील खालापूर तालुक्यातील मौजे केळवली, वांगणी, घोडवली, कांढरोली, नावंढे, माणकिवली, अंजरूण, हाळखुर्द आणि कर्जत तालुक्यातील तळवली येथील खालापूर औद्योगिक वसाहत भाग २ करिता प्रस्तावित १ हजार १७३ हेक्टर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया रायगड येथील जिल्हाधिकार्‍यांद्वारे चालू आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्याबरोबर वाटाघाटी चालू असून त्यांची संमती असेल तरच जमिनी घेऊन त्यानुसार दर निश्‍चित केला जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज  विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात सांगितले.

प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, अतुल भातखळकर, अधिवक्ता आशिष शेलार, श्रीमती मनिषा चौधरी आदी सदस्यांनी याबाबतचा  प्रश्‍न विचारला होता.

भूसंपादनाची प्रकिया चालू असतांना शेतकर्‍यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तारापूर प्रकल्पाचा प्रश्‍न केंद्र शासन  अखत्यारीत आहे. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. याविषयी सदस्यांच्या तक्रारी असल्याने त्याची माहिती घेऊन बैठक घेण्यात येईल. राज्यात ज्या परिसरात शासकीय जमिनी विनावापर पडून असतील, तर त्या जमिनी औद्योगिक वसाहतींसाठी देण्यात येतील; मात्र शासकीय जमिनी नसतील, तर औद्योगिक वसाहतीसाठी खाजगी जमिनी घ्याव्या लागतील. या जमिनी मिळण्यासाठी बैठका चालू आहेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.