भारत-ऑस्ट्रेलियात आजपासून तिसरी कसोटी

 

मालिकेत भारत-ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 1 कसोटी जिंकली

रांची, 16 मार्च 2017:

गावस्कर-बॉर्डर मालिकेतील भारत आणि ऑस्टेलियादरम्यानची तिसरी कसोटी आजपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक कसोटी जिंकली आहे. त्यामुळे रांची येथे आजपासून सुरू होणारी कसोटी जिंकून कोण आघाडी घेणार याकडे साऱ्या क्रिकेट शौकीनांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी मागच्या दोन सामन्यांपासून रंगलेला खेळपट्टीचा वाद याही सामन्याच्या पार्श्वभूमीवर रंगणार की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने नेहमीच रंगतदार होतात. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर दुसरा सामना खेचून आणता भारताने बरोबरी साधली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे. मात्र दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधारी स्टीव्ह स्मिथ याने डीआरएस रिव्ह्युचा निर्णय घेतल्यामुळे वाद उद्भवला होता. त्यानंतर दोन्ही कडील खेळाडूंनी मैदानाबाहेर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे प्रथमच झारखंड राज्य क्रिकेट संघाच्या रांची येथील स्टेडीयमवर होणाऱ्या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.  माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना होणार आहे. धोनीनेही मैदानाची तसेच खेळपट्टीची पाहणी केली आहे. रांचीमध्ये आठवड्याभरापूर्वी पाऊस होऊन गेला. त्यामुळे सामन्यादरम्यान खेळपट्टी काय रंग दाखवते आणि कुठल्या संघाला त्याचा फायदा मिळेल, हे पाहणे रंजक ठरेल.

भारतासाठी चिंतेचा विषय म्हणजे कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून बरसणाऱ्या धावा आटल्या आहेत. आतापर्यंत दोन कसोटींमध्ये त्याने 0,13 आणि 12, 15 एवढ्याच धावा केल्या आहेत. त्यामुळे महत्वाच्या या सामन्याततरी कोहलीची बॅट तळपेल, अशी त्याच्या चाहत्यांची आशा आहे.