परदेशी चित्रपट निर्मात्यांसाठी भारत आकर्षक स्थळ

केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राठोड          

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2017:

परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात सहज प्रवेश मिळावा यासाठी केंद्र सरकारने चित्रपट व्हिजा ही नवी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आणि चित्रपट सुविधा कार्यालयामुळे परदेशी निर्मात्यांसाठी भारत चित्रकरणाचे एक आकर्षण केंद्र बनले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केले.

राठोड यांनी सोमवारी रशियाचे दूरसंचार  उपमंत्री एलेक्सी वॉलिन यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अॅनिमेशन, व्हिज्यूवल इफेक्ट्स, गेमींग आणि कॉमिक्स, यासाठीचे राष्ट्रीय केंद्र मुंबईत सुरु केले जाणार आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली. या सर्व क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्र प्रयत्न करतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दोन्ही देशातल्या संस्कृतींचे आदानप्रदान व्हावे, यासाठी सिनेमा हे उत्कृष्ट माध्यम असून, भारतीय आणि रशियन चित्रपट परस्परांच्या देशात दाखवले जावे, यासाठी विशेष चित्रपट महोत्सव भरवले जावे, अशी सूचनाही राठोड यांनी केली