आजपासून एक्सप्रेस वे वरचा प्रवास महागला

टोल नाक्यावर 195 ऐवजी 230 रुपये मोजावे लागणार

मुंबई, 1 एप्रिल 2017/AV News Bureau:

एकीकडे टोल घेण्याला नागरिकांचा विरोध होत असतानाच आजपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील टोलची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना 195 ऐवजी 230 रुपये द्यावे लागणार असून ही वाढ 35 रुपयांची आहे.

महामार्गांवर घेण्यात येणाऱ्या टोलमुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना असून अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलने झाली आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलबाबत राजकीय पक्षांनीदेखील विरोधाची भूमिका घेतली होती. मात्र करारातील तरतुदींनुसार या मार्गावरील टोल बंद करणे वा सदर कंपनीचे कंत्राट रद्द करणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक्सप्रेस वेच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार आजपासून जादा दर आकारला जाणार आहे.