पनवेल महापालिका हद्दीतील झोपडीवासियांचे पुनर्वसन करा

आमदार बच्चू कडू यांची मागणी

पनवेल, 4 एप्रिल 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका हद्दीत गेल्या 15 वर्षांपासून असलेल्या झोपड्यांवर कोणतीही नोटिस न देता सिडकोने कारवाई केली आहे. यामुळे शेकडो गरीबांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे येत्या 5 एप्रिल रोजी मनपा आयुक्त निंबाळकर यांच्या उपस्थितीत झोपडीवासियांची बैठक घेवून सकारात्मक तोडगा काढावा,अशी विनंती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांना केली आहे.

नियमात बसणारी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत सरकारने सुधारीत विधेयकास नुकतीच मंजूरी दिली आहे. मात्र तरीही काही अधिकारी बिल्डर लॉबीचा फायदा करण्यासाठी झोपडपट्टीवासियांच्या मागे लागल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष गवस यांनी केला आहे.

महापालिका हद्दीतील झोपडीवासियांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गवस यांनी दिला आहे.