अडवाणी, जोशींसह 13 नेत्यांविरोधात खटला

बाबरीप्रकरणी  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2017 :

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह तेरा जणांवर अयोध्येतील वादग्रस्त वास्तू  पाडल्यासाठी कट रचल्याचा खटला चालवला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज याबाबत निर्णय सुनावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी दोन वर्षात पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याने त्यांच्याविरोधात खटला रद्द करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री कल्याणसिंह सध्या राजस्थानचे राज्यपालपदी असल्याने त्यांना खटल्यातून वगळण्यात आले आहे. त्यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे.

या प्रकरणी सध्या लखनौ आणि रायबरेलीच्या सत्र न्यायालयात दोन वेगवेगळे खटले सुरू आहेत. हे दोनही खटले एकत्र करून त्यांची सुनावणी रोज करावी असही न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या दरम्यान न्यायाधिशांची बदली होणार नाही असही स्पष्ट केले आहे.