खारघर  येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

अग्निशमन विभागाची सूचना 

नवी मुंबई, 24 एप्रिल 2017/AV News Bureau:

दोन व्यक्तींचा बळी घेणाऱ्या खारघर येथील मारूती सुझुकीच्या शोरूम आग प्रकरणाची अग्निशमन दलाचे गंभीर दखल घेतली आहे. आगीमुळे इमारतीच्या बांधकामाला धोका पोहोचली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी सूचना अग्निशमन विभागाने सोसायटीच्या सदस्यांना केली आहे.

सायन- पनवेल महामार्गाजवळील खारघर, सेक्टर 10 येथील आदित्य प्लॅनेट या इमारतीच्या खाली असणा-या मारूती सुझुकीच्या शोरूमला रविवारी (ता.23) आग लागली होती. या आगीत तेथे सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या कृष्णकुमार आणि जितेंद्रकुमार या दोघांचा मृत्यू झाला होता. तर 10 ते 12 गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या. या आगीमुळे इमारतीच्या पिलरना धोका पोहोचल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर रहिवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे ,अशी सूचना सोसायटी सदस्यांना करण्यात आल्याची माहिती सिडकोचे मुख्य अग्निशमनदल अधिकारी  अरविंद मांडके यांनी दिली.