नवजात बालकांमधील श्रवणक्षमतेचे मूल्यमापन शक्य

नवी मुंबई महापालिका रूग्णालयात ऑटो ऑकस्टीक इमिशन (OAE) प्रणाली कार्यान्वित

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 फेब्रुवारी 2023

 मूल जन्माला आल्यानंतर कुटुंबात आनंद साजरा केला जातो. आपले मूल सुदृढ असावे अशी पालकांची अपेक्षा असते मात्र दुर्देवाने काही पालकांना मुलांमधील जन्मजात दोषांचा सामना करावा लागतो. अशावेळी मुलांमधील दोषांचे किंवा आजारांचे वेळीच निदान झाले तर उपचार करणे शक्य होते. त्यातही नवजात बालकांची संपूर्ण वैद्यकीय चाचणी झाल्यास त्यांमधील दोष किंवा आजार वेळीच समजतात आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य होते. याच हेतूने नवी मुंबई महानगरपालिकेने नवजात बालकांसाठी विशेष ऑटो ऑकस्टीक इमिशन (OAE) चाचणी सुरू केली आहे. या चाचणीमुळे बालकांमधील बहिरेपणा, हायपोथोरॉईड यांसारख्या आजारांचे निदान होवू शकणार आहे. या चाचणीमध्ये नवजात बालकांमधील श्रवण क्षमतेचे मूल्यमापन करता येते. अशी चाचणी खासगी रूग्णालयांमध्ये केली जाते मात्र महापालिका स्तरावर अशी चाचणी करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे.

नवजात बालकांमधील बहिरेपणा दुर्लक्षित राहिल्यास अशी बालके मूकबधिर होण्याची शक्यता असते त्यामुळे बालकांमधील श्रवणक्षमता वेळीच लक्षात येणे आवश्यक आहे. महापालिकेने यासाठी सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ व वाशी येथे बालरुग्णांसाठी ओएई स्क्रिनींग तर सार्वजनिक रुगणालय नेरुळ, वाशी व ऐरोली येथे बालरुग्णांची काळजी घेण्याच्या दृष्टीने हायपोथायरॉईड स्क्रिनींग विनामुल्य उपलब्ध करुन दिली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये नवजात शिशुंना तपासून गरज वाटल्यास पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यात येत आहे. बालरुग्णांच्या वेळीच चाचण्या केल्यामुळे / मुकबधिर बाळांना यामुळे वेळेत उपचार मिळू शकतील किंवा त्यावर योग्य औषधोपचार केले जाऊ शकतील. 19 डिसेंबर ते  23 डिसेंबर या कालावधीत प्रसवोत्तर दक्षता विभागातील (पीएनसी) 46  नवजात शिशुंची तापसणी करण्यात आली त्यामधील 27  नवजात शिशुंना , तर एनआयसीयूमधील 15  नवजात शिशुंची तपासणी करू त्यामधील 10 शिशुंना  तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यात आले आहे.

  • ऑटो ऑकस्टीक इमिशन (OAE) म्हणजे काय ?

कानाच्या आतील भागातून बाहेर पडणा-या ध्वनीलहरींची तपासणी म्हणजे ओएई. कानाच्या आतील भागात काही समस्या असतील तर या ध्वनीलहरी परिणाम दाखवतात. या ध्वनीलहरी तपासणीसाठी ऑटो ऑकस्टीक इमिशनचा उपयोग होतो.

प्रत्येक नवजात शिशुची अशी चाचणी होणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने यासाठी पुढाकार घेत शहरातील शिशुंसाठी ही चाचणी विनामूल्य उपलब्ध केली आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे आता शिशुंमधील श्रवणदोषांचे निदान करता येणे शक्य होणार आहे.

डॉ. प्रमोद पाटील, मुख्य वैदयकीय अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

=================================

  • अविरत वाटचाल  YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र