भारतात मुलांमध्ये फुटबॉलप्रेम रुजविण्यासाठी फिफाचा आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या फुटबॉल क्रीडांगणात पार पडला कार्यक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १ नोव्हेंबर २०२२

नवी मुंबईत रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यापूर्वी फिफा आणि केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामध्ये फुटबॉल खेळाच्या विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्वाचा सामंजस्य करार झाला. भारत सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच फिफाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जियानी इन्फॉटिनो यांनी सामंजस्य कराराचे माहितीपत्र अनावरण केले.

याप्रसंगी केंद्रीय गृह व क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांचे अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

फुटब़ॉलच्या माध्यमातून मुलांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी फिफाच्या वतीने जागतिक पातळीवर ‘फुटबॉल फॉर स्कूल’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून शैक्षणिक उपक्रमांमध्ये फुटबॉल खेळातून सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील 2.5 कोटी मुलांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविला जात असून त्याबाबतचा सामंजस्य करार कार्यक्रम नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणामध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

भारतातील मुलांमध्ये फुटबॉल खेळात उंची गाठण्याची क्षमता असून ही मुले फुटबॉलमध्ये भारताचा नावलौकिक उंचावतील असा विश्वास यावेळी फिफाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जियानी इन्फॉटिनो यांनी व्यक्त केला. फुटबॉलच्या शास्त्रशुध्द प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण, विकास आणि सक्षमीकरण असे तिन्ही उद्देश साध्य होतील असेही ते म्हणाले.

फुटबॉलच्या विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याकरिता सरकारमार्फत संपूर्ण नियोजन केले जाईल असे यावेळी केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केंसरकर यांनी राज्यातील शाळा-शाळांमधून मुलांमधील फुटबॉलच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याची भूमिका विषद केली. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही क्रीडांगणाची पाहणी करीत मुलांचा उत्साह वाढविला.

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 10 क्रीडा शिक्षक तसेच 50 विद्यार्थी व 50 विद्यार्थिनींना फुटबॉल फॉर स्कूल या उपक्रमाचा शुभारंभ होताना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याची प्रात्यक्षिके मान्यवरांच्या समोर सादर करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाचे कौतुक सर्वच मान्यवरांनी केले.

दरम्यान,“17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” आयोजित करण्याचा बहुमान यावर्षी भारताला लाभला. या स्पर्धेतील 10 सामने नवी मुंबईतील डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियम मध्ये पार पडले. विशेष म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामनाही नवी मुंबईत रंगला.

स्पर्धेचे यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने खेळाडू व क्रीडाप्रेमी रसिकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. तसेच शहरात फुटबॉल वातावरण निर्मितीसाठी चित्रभिंती, शिल्पाकृती, चित्ररथ, बलुन्स, शाळांमधील उपक्रम अशा विविध माध्यमांचा उपयोग करण्यात आला. स्पर्धेच्या सामन्यांपूर्वी संघांना सराव करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 19 ए नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाला विविध देशांच्या संघांनी प्रथम पसंती दिली. स्पेन, चीन, मलेशिया अशा विविध देशांच्या संघांनी फुटबॉल मैदानावरील हिरवळीचे व तेथील व्यवस्थेचे मुक्तकंठाने कौतुक केले.