तब्बल साडेपाच कोटी रूपयांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द

नवी मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 ऑगस्ट 2023

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या कोटयवधी रुपयांच्या मुद्देमालांचे हस्तांतरण आज  14 ऑगस्ट रोजी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने संबंधित फिर्यादींना करण्यात आले. वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात यानिमित्ताने नवी मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी सोने आणि रोख रक्कम चोरीला गेलेल्या ७४ फिर्यादींना तब्बल २ कोटी ९ लाख २३ हजार ३८४ इतक्या किंमतीचे त्यांचे सोने आणि रोख रक्कम परत करण्यात आली तर ३ कोटी ३२ लाख ४ हजार ९९ रूपये किमतीचे एकूण वाहन, मोबाईल, इतर सर्वसाधारण मुद्देमाल १७४ फिर्यादींना असे एकूण २४८ फिर्यादींना तब्बल ५ कोटी ४१ लाख २७ हजार ६८३ रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. आपले चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, काळानुरूप गुन्हे घडण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. टिव्ही मधील एखादी मालिका पाहून  गुन्ह्याची पध्दत वापरली जाते. चोरी करण्याची पद्धत बदलली तशीच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनीही आपली तापस कार्यपद्धती बदलली आहे. कठिण गुन्ह्यांमध्येही तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना शोधतात त्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुकच असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबईत शहरात अंमली पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून हे प्रमाण कमी करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. तसंच त्यापासून नागरिकांना सावध करण्यासाठी नवी मुंबई पोलीस पुन्हा जनजागृती अभियान राबविणार असल्याचंही आयुक्त भारंबे यांनी सांगितले.

परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, गुन्हा घडतो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असतो. असे गुन्हे घडताना त्याचा परिणाम त्यांच्या भावनांवर होत असतो. मौल्यवान वस्तूंची चोरी होतो तेव्हा त्याचा तपास करताना भूतकाळही विचारत घेतो. मात्र मालमत्ता गुन्ह्यांच्या बाबतीत तसे होत नाही. त्यामध्ये छोटासा क्लू तपासात मदत करतो. आयुक्तालय हद्दीत २ हजार ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. घराभोवती सीसीटीव्ही लावले तर गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल.

  • राष्ट्रपती पदक विजेत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांचा सत्कार

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यानिमित्ताने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला हजर असलेल्या आ.मंदा म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, आ. गणेश नाईक,आ.महेश बालदी यांच्याहस्ते राष्टपती पदक विजेत्या तनवीर शेख यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई,  संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,  दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, विवेक पानसरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ पंकज डहाणे यांच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

========================================================