महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व क्षेत्रातून प्रयत्न गरजेचे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन

मुंबई,6 मे 2017/AV News Bureau:

देशाच्या प्रगतीसाठी महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. आज देशभर ट्रिपल तलाक ची चर्चा होत आहे. या समस्येने अनेक महिला रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या समस्या सोडवून न्याय देणे गरजेचे आहे. महिलांशी संबधित असलेले अनेक प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग सक्षम असून, ते सोडविण्यासाठी सर्व क्षेत्रातून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रिपल  तलाक’ याविषयी पीडित महिलांच्या समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुखाने संसार करीत असताना अचानक पती फोनवरुन ट्रिपल तलाक घेतो, यावेळी मौखिक तलाक, खलाला, बहुपत्नीत्व अशा अनेक समस्यांचा त्रास महिलांना होत असून या तक्रारी महिला आयोगाकडे महिला घेवून येतात. अशा समाजातील कुप्रथा बंद होणे गरजेचे आहे. जेव्हा या कुप्रथा समाजातून बंद होतील त्यावेळी खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान व न्याय मिळू शकेल. याकरिता समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे,असे त्या म्हणाल्या.

या कायद्याने महिला त्रस्त असून या समस्येतून तिला बाहेर काढणे अतिशय गरजेचे आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सर्व क्षेत्रातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी सारखा असून प्रत्येकाने महिलांना आदराने व सन्मानाने वागवावे, असेही आवाहन रहाटकर यांनी केले.

यावेळी पीडित महिलांनी ट्रीपल तलाक विषयी आपल्या समस्या या चर्चासत्रात मांडल्या. नूरजहाँ साफीया नियाज, खातून शेख,  मुमताज आदींनी या चर्चासत्रामध्ये भाग घेतला