देवाची मर्जी असेल तर राजकारणात उतरेन

चेन्नई, 17 मे 2017:

‘द बॉस’ या नावानेच फिल्म इंडस्ट्रीत ओळखल्या जाणाऱ्या सुपरस्टार रजनिकांत यांनी राजकारणात सक्रीय होण्यास आपली हरकत नसल्याचे म्हटले आहे. सध्या तरी आपण राजकारणात उतरण्याचा कोणताही विचार केलेला नाही. मात्र देवाची मर्जी असेल तर भविष्यात त्याबाबत  विचार करीन, असे रजनिकांत यांनी स्पष्ट केले.

आपण आयुष्यात काय करायचे, याचा निर्णय देवच करीत असतो. त्यामुळे सध्या मी अभिनेता म्हणून काम करावे आणि आपली जबाबदारी निटपणे पार पाडण्याचा प्रयत्न करावा, अशी त्यांची इच्छा असावी. त्यामुळे भविष्यात देवाने तशी परिस्थिती निर्माण केली तर राजकारणातही प्रवेश करू, असे रजनिकांत म्हणाले.

नेहमी साधे आणि सरळ जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या राजकारणाबाबतही सडेतोड विचार मांडले आहेत. जर आपण राजकारणात सक्रीय झालो तर अतिशय प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करू. मात्र जे लोक पैसे कमावण्यासाठी राजकारणात आले आहेत, त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुपरस्टार रजनिकांत यांनी चाहत्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढता यावी यासाठी त्यांनी खास वेळ राखून ठेवला आहे. त्यामुळे आपल्या सुपरस्टारसोबत सेल्फी काढण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर रजनिकांत यांनी राजकारण प्रवेशाबाबतचे आपले मत व्यक्त केले.