राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्गात

आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

 सिंधुदुर्गनगरी,19 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत या कार्यशाळेच्या उभारणीच्या बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • प्रयोगशाळा चार विभाग कार्यरत

संसर्गजन्य संशोधन प्रयोगशाळेत सूक्ष्मजीव शास्त्र, विषाणू विभाग, रक्तातील पातळ द्रव्याच्या अभ्यासाचा विभाग व रेण्वीय विभाग असे चार विभाग कार्यरत राहणार आहेत. या प्रयोग शाळेत एकूण 13 रोगांवरील तपासण्या होणार आहेत. या प्रयोगशाळेत वीज पुरवठा अखंड उपलब्ध रहावा यासाठी जनरेटर सुविधा तसेच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम लवकरात-लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सावंत यांनी दिल्या.

  • कॅसनूर जंगल आजाराबाबत समन्वय आवश्यक

सिंधुदुर्गातील कॅसनूर जंगल आजार साथीबाबत आरोग्य, वन, पशुसंवर्धन व ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम करावे, अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली. जंगलातील पायवाटा व जनावरे चरत असलेल्या ठिकाणी प्रतिबंधक पावडर फवारणीसाठी आवश्यक यंत्रे घ्यावीत. जिल्हा नियोजन समिती मार्फत पावडर, डी.एम.पी.ऑइल आदी बाबत तरतूद करुन अधिक निधी लागत असेल तर तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पहावे, पशुधन व संभाव्य गावातील लोकांच्या लसीकरणासाठी कृतीशील आराखडा तयार करावा. आदी सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या. कॅसनूर जंगल आजारा बाबत सिंधुदुर्गात स्वतंत्र सेल साठी लागणारा कर्मचारीवर्ग आरोग्य विभागामार्फत दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • पशुसंवर्धन विभागाच्या दोन मोबाल व्हॅन

कॅसनूर जंगल आजारा अंतर्गत जिल्ह्यातील पशुधानाचे लसीकरण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन मोबाइल व्हॅन उपलब्ध करुन दिल्या जातील असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले. यासाठी आवश्यक आयव्हरमेटीन इंजेक्शनचा पुरेसा साठा विभागाकडे उपलब्ध असण्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.