शेकाप आघाडीला चारीमुंड्या चीत करा

अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट 

पनवेल, 19 मे 2019 /AV News Bureau:

राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आम्ही संपविले असल्यामुळे ती केवळ दोन जिल्ह्यांपुरती शिल्लक आहे. काँग्रेस  पक्षाला आता दुसऱ्याच्या हातात हात घालून उमेदवार निवडावे लागत आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस लंगडे झालेले असल्यामुळे हातात हात आणि पायात पाय घालून शेकापसोबत आघाडी करीत आहेत. या निवडणुकीत  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेत्तृत्वाखाली शेकाप आघाडीला चारी मुंड्या चित करा, असे आवाहन  अन्न पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी नवीन पनवेल येथे केले. गुरुवारी प्रभाग ९ च्या भाजप युतीच्या प्रचारकार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, तालुका सरचिटणीस दशरत म्हात्रे, प्रभाग नऊ चे उमेदवार महादेव मधे, प्रतिभा भोईर, संगिता कांडपाल, शंकर विरकर,प्रभाग १६ चे उमेदवार संतोष शेट्टी,समीर ठाकूर  प्रभाग नऊचे प्रभारी मारूती चिखलेकर, अमन अख्तर,के के कडव, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसची 125 वर्षांची परंपरा आहे. त्या पक्षाला आता दुसऱ्याच्या हातात हात घालून उमेदवार निवडावे लागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचीही  परिस्थिती  बिकट असून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी कुठेही या पक्षाचा अंश शिल्लक नाही. पनवेलमध्येही महापालिका निवडणुकीत या पक्षांचा पराभव होणार असून भाजपचा झेंडा फडकरणार आहे  असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

पूर्वी ८५ टक्के लोक ग्रामीण भागात राहायचे आता केवळ ४० टक्के नागरिक ग्रामीण भागात राहत असून मोठ्या प्रमाणावर विस्थापन झाल्यामुळे शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरी समस्यांवरील ताण दूर करून नागरिकांच्या  सुरक्षा आणि समृद्धीसाठी  देण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जनतेसाठी विविध योजना आणल्या आहेत,असे बापट म्हणाले.

 

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सामान्य जनता भाजपसोबत आहे. भाजप युतीच्या उमेदवारांना प्रचारात सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. सिडकोची या परिसरात सुविधा देण्यास टाळाटाळ केल्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी वारंवार आंदोलने केली. टेम्भोडे येथील पिण्याच्या पाण्याबाबत भाजपने पाठपुरावा केला असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागतोय. खिडूकपाडा, आसुडगाव येथील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची भाजपाची भूमिका आहे. नागरिकांच्या सूचनांच्या आधारे भाजपने दशसूत्री दशमान योजना हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पायाभूत सुविधांचा विकास,स्वच्छता,रस्ते,गटारे,बगीचे,क्रीडांगणे,रुग्णालय,पार्किंग अशा बाबींवर भर देण्यात येईल. – आमदार प्रशांत ठाकूर