पनवेलचा पारा 36 अंश सेल्सिअस

दुपारचे मतदान मंदावण्याची भिती

नवी मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच शहराचे तापमानही वाढू लागले आहे. पनवेल आणि आजुबाजूच्या परिसराचे तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याची माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास नागरिक मतदानाला घराबाहेर पडतील का, याची चिंता आता उमेदवारांना लागली आहे.

पनवेल महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी चांगली सुरूवात झाली. सकाळी 9.30 पर्यंत 11 टक्क्याच्या आसपास मतदान झाले होते. तर  11.30 पर्यंत हाच मतदानाचा टक्का 23 पर्यंत पोहोचला होता. मात्र दुपारचे ऊन वाढू लागल्यामुळे उमेदवारांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे.

उन्हाचा ताप चांगलाच वाढला असून रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये 33 अंश सेल्सिअस तर भिरामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले आहे. ठाणे जिल्ह्यातील तापमान 39 अंश सेल्सियसपर्यंत असल्याची माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उन्हाळी सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल की नाही, याची चिंता उमेदवारांना वाटत आहे. त्यातच आता उन्हाचा ताप वाढू लागल्यामुळे मतदानासाठी मतदार दुपारचे घराबाहेर पडतील का, अशी चिंता आता उमेदवारांना सतावू लागली आहे. मात्र उन्हाचा ताप कमी झाल्यानंतर मतदार मतदान घराबाहेर पडतील आणि संध्याकाळी शेवटच्या टप्प्यात चांगले मतदान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • मुंबईचे तापमान 34 अंश सेल्सिअस

मुंबईत कुलाबा येथे 34.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ येथे 34 अंश सेल्सिअस इतके तापमान असल्याची माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.