अफगाणिस्तानात भारतीय दुतावासाजवळ बॉम्बस्फोट, 80 ठार 350जखमी

काबुल, 31 मे 2017:

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील भारतीय दुतावासाजवळ आज सकाळी भिषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सुमारे 80 जण ठार तर 350 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात भारतीय दुतावासातील कोणीही कर्मचारी जखमी झालेले नसल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.  या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही.

सेंट्रल झेनबक स्क्वेअरजवळ दहशतवाद्यांनी कारबॉम्बचा स्फोट घडवला. एका ट्रकमध्ये स्फोटके भरून हा स्फोट घडवल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. स्फोटामुळे 100 मीटरच्या अंतरात मोठ्या प्रमाणात घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे भारतीय दुतावासाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.  या स्फोटानंतर धुराचे लोट आकाशात पसरले होते. या स्फोटामुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काबुलमधील भारतीय दुतावासाजवळ झालेल्या स्फोटांत भारतीय कर्मचारी जखमी झाले नसून सर्वजण सुखरुप असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे. दहशतवादी हल्ल्यांचा भारत निषेध करीत आहे. दहशतवादाविरोधात अफगाणिस्तानने सुरू केलेल्या प्रयत्नांना भारताचा भरीव पाठिंबा असल्याचेही मोदी यांनी  म्हटले आहे.

  • राष्ट्रपती निवासापासून काही अंतरावर स्फोट

ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. तेथून काही अंतरावरच अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. तसेच आजुबाजूला अन्य देशांचे दुतावासही आहेत. त्यामुळे या स्फोटामुळे त्या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.