३१ ऑक्टोबरपूर्वीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार

अभ्यासासाठी आयटीची मदत घेणार- मुख्यमंत्री

मुंबई, ६ जून २०१७/AV News Bureau:

राज्यातील गरजू शेतकऱ्यांचे कर्ज ३१ ऑक्टोबर पूर्वीच माफ करण्यात येणार आहे. ही इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयटी बेस्ड टेक्नॉलॉजीचा आधार घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकडे अधिक लक्ष देणार आहोत. त्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर पूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मागच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता. त्यामुळे आता तसा प्रकार होवू नये म्हणून IT बेस्ड टेक्नॉलॉजीचा आधार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. जे शेतकऱ्यांचे खरे नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करणाऱ्यांशी चर्चा होऊ शकत नाही. कर्जमाफीबाबत ज्यांना सूचना द्यायच्या आहेत त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र बंदच्या काळात काल 307 बाजार समित्यांपैकी 300 कार्यरत होत्या. इतर 7 पैकी 3 बाजारात समित्यांनी बंद पाळला, तर बाजार समित्या 4 सुट्टीवर होत्या.”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवाय, हिंसा झाली त्याठिकाणी कुठल्या पक्षाचे लोक होते, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे, असेही ते म्हणाले.

व्यंकय्या नायडूंचा टोला

 “यूपी, तेलंगणा, आंध्रमध्ये कर्जमाफी झाली, ती त्या राज्यांनी दिली. त्यांची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात दूरगामी निर्णय घ्यावे लागणार आहेत. शिवसेना आणि राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी सरकारमध्ये राहून काय करतील हे पहावं, असा टोला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मारला.